Sat, Oct 24, 2020 23:19होमपेज › Satara › साताऱ्यातील 'त्या' सभेच्या वर्षपूर्तीनिमीत्त राष्ट्रवादीचा जल्लोष

साताऱ्यातील 'त्या' सभेच्या वर्षपूर्तीनिमीत्त राष्ट्रवादीचा जल्लोष

Last Updated: Oct 19 2020 1:20AM

शरद पवारसातारा : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भर पावसातील ऐतिहासिक सभेला आज ( दि. १८ ) वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षी याच  दिवशी साताऱ्याच्या जिल्हा परिषद मैदानावर त्यांची वादळी सभा झाली होती. या सभेच्या वर्षपूर्तींनिमित्त सातारा राष्ट्रवादी काँग्रेस भवनसमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. सोशल मीडियावरही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभेला उजाळा दिला.

खा. शरद पवार यांच्या भरपावसातील सभेने २०१९ च्या विधानसभेचा नूरच पालटून टाकला. पावसाबरोबर खुद्द शरद पवारही या सभेत चांगलेच बरसले. त्याचेच फळ महाविकास आघाडीच्यारूपाने महाराष्ट्राला मिळाले. या सभेला रविवार दि. १८ रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या सभेच्या वर्षपूर्तीचा जल्लोष महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साजरा केला. 

राजधानी सातार्‍यात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. तसेच पवार यांच्या पावसातील सभेचे मोठे एलईडी स्क्रीन लावून चित्रीकरण करण्यात आले. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये पवार यांच्या सभेची वर्षपूर्तीनिमित्त फटाक्यांजी आतषबाजी करून केक कापण्यात आला. त्या सभेचा वृत्तांत यावेळी दाखवण्यात आला.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, पवार साहेबांची ही सभा राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. एका सभेने महाराष्ट्राचे राजकारण बदलले आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. भविष्यकाळात तरूणांना प्रेरणा देणारी ही सभा झाली आहे. ही सभा प्रेरणादायी रहावी म्हणून या सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी अशी सभा घेतली जाणार आहे.

अतिवृष्टी फार झाली आहे पिकांचे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या गावातील भागातील महसूल अधिकार्‍यांना बरोबर घेवून पाहणी करून पंचनामे करावेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सुध्दा नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. दरम्यान, रविवारी दिवसभर सोशल मीडियावरही या सभेचे विविध फोटो,चित्रफिती व्हायरल होत होत्या. सातारा राजधानीतील ऐतिहासिक सभेच्या आठवणींना राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उजाळा दिला.

 "