Fri, Jul 10, 2020 18:11होमपेज › Satara › सत्ताधार्‍यांचा गोंधळ, राजकारणाचा फटका

सत्ताधार्‍यांचा गोंधळ, राजकारणाचा फटका

Published On: Dec 07 2017 1:30AM | Last Updated: Dec 06 2017 10:46PM

बुकमार्क करा

कराड : चंद्रजीत पाटील

निवडणुकीपूर्वी झोपडपट्टी मुक्त कराड, चोवीस तास पाणी योजना तसेच चांगल्या भौतिक सोयी - सुविधा पुरवण्याचे सत्ताधार्‍यांचे आश्‍वासन वर्षभरानंतरही केवळ आश्‍वासनच राहिले आहे. सत्ताधारी भाजपा आणि बहुमतात असलेल्या जनशक्तीतील गोधळामुळे काम पूर्ण होऊनही बहुचर्चित स्विमिंग टँक नागरिकांसाठी कधी खुला होणार, हा प्रश्‍न अद्याप अनुत्तरीतच आहे. याशिवाय केवळ सोयी - सुविधांच्या अभावामुळे गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन केव्हा होणार? हे वर्षभरानंतर कोणीच सांगू शकत नाही.

स्थानिक नगरसेवकांच्या प्रयत्नांचा आढावा घेतला असता लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील, अनिता पवार यांच्यासह माजी नगरसेवक सुहास पवार यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे दिसून येते. मात्र सत्ताधारी आणि भाजपामधील गोंधळाच्या स्थितीचा या प्रभागातील विकासकामांवर परिणाम होत आहे. कृष्णा पूल परिसरातील विद्युतीकरणासाठी सौरभ पाटील आग्रही होते. मात्र काहींनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. त्याविरूद्ध आवाज उठवल्यानंतर ही कामे पूर्ण झाली आहेत.

दुसरीकडे तत्कालीन मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून निधी मिळाल्याने स्विमिंग टँक मंजूर झाला. मात्र सत्ताधारी भाजपा आणि जनशक्ती आघाडीतील गाेंंधळाचे वातावरण पाहता केवळ उद्घाटन केव्हा आणि कोणाच्या उपस्थितीत घ्यायचे? यासाठीच हे काम अडले आहे. रूक्मिणीनगर झोपडपट्टीमधील 70 कुटुंबांना घरकूल मंजूर झाले आहे. घरकुलांचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र स्थायी समितीच्या बैठकीत घरकुलांसाठी विद्युत पुरवठा व्हावा, म्हणून आवश्यक डीपी बसविण्याबाबत ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.