Sat, Feb 22, 2020 10:08



होमपेज › Satara › पोलिसाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

पोलिसाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

Last Updated: Jan 22 2020 2:18AM




सातारा : प्रतिनिधी

सातारा पोलिस मुख्यालयातील कर्तव्य बजावत असलेल्या अक्षय सतीश कांबळे (मूळ रा. भरतगाव ता.सातारा) या पोलिसाविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलिसानेच याबाबत तक्रार दिली असून शाहूपुरी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहेे. दरम्यान, संशयिताने एका पोलिस ठाण्यात आत्महत्या नाट्याचा प्रयत्न केला असल्याचीही धक्‍कादायक माहिती समोर आली असून या सर्व प्रकाराने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील पिडीत तक्रारदार युवती त्याही पोलिस आहेत. संशयित अक्षय कांबळे व तक्रारदार युवती यांची ओळख आहे. या ओळखीचा गैरफायदा घेवून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याशी लग्न करतो,’ असे सांगून आश्‍वासन दिले. लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने जून 2019 ते नोव्हेबर 2019 या कालावधीत राधिका रोड येथील एका खोलीत संशयिताने इच्छेविरुध्द वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले.

संशयित पोलिस अक्षय कांबळे याने तक्रारदार युवतीकडून 50 हजार रुपये उसने घेतले. गेल्या काही दिवसांपासून तक्रारदार युवतीने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर संशयित त्याबाबत टाळाटाळ करु लागला. उसने घेतलेले पैसे मागितल्यानंतर ते पैसेही देण्यास संशयिताने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार युवतीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात जावून घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 

पोलिसांनी त्यानुसार पोलिस अक्षय कांबळे याच्याविरुध्द बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला पोलिसांनी अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्याला पोलिस कोठडी दिली.

आत्महत्या प्रयत्नाचे नाट्य थरार...

बलात्काराचा गुन्हा दाखल होण्यापूर्वी संशयिताला एका पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीवेळी तू तू मैं मैं झाल्याने गोंधळ झाला. वादावादी सुरु असतानाच संशयिताने विषाची बाटली काढली व ती प्राशन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संपूर्ण पोलिस ठाण्यात पळापळ झाली व संशयिताकडून विषाची बाटली ताब्यात घेण्यात आली. या सर्व नाट्य प्रकारानंतर संबंधितांचा ताबा घेवून त्यांना शाहूपुरी पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले.