होमपेज › Satara › राष्ट्रवादीच्या घोटाळ्याची कुंडली माझ्याकडे : रणजितसिंह नाईक-निंबाळकर 

राष्ट्रवादीच्या घोटाळ्याची कुंडली माझ्याकडे : रणजितसिंह नाईक-निंबाळकर 

Published On: Apr 13 2019 1:51AM | Last Updated: Apr 12 2019 11:25PM
दहिवडी : प्रतिनिधी

राष्ट्रवादीने केलेल्या 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची कुंडली माझ्याकडे आहे. त्यामुळे तुम्हीच ठरवायचंय की या लबाडांना मतदान करायचंय की नाही. पाणी प्रश्‍नावर माढा लोकसभा मतदार संघातील ही शेवटची निवडणूक असेल, असा दावा माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी  केला. 

मलवडी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, बाळासाहेब मासाळ, विजयकुमार साखरे, डॉ. उज्ज्वलकुमार काळे आदी  उपस्थित होते.

रणजितसिंह नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, आपली  लढाई संजय शिंदे यांच्याशी नसून थेट बारामतीकरांशी आहे. बारामतीकरांनी एकही शब्द पूर्ण केला नाही. पाण्यापेक्षा पैसा खाण्याकडे यांचे अधिक लक्ष राहिले आहे. यांच्या घोटाळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राष्ट्रवादीने केलेल्या 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची कुंडली माझ्याकडे आहे. योग्य वेळ आल्यावर ती मी बाहेर काढेनच, असे सांगून ते पुढे म्हणाले, राज्यात अनेक चांगली घराणी आहेत. मात्र, त्या घरात वाद लावण्याचे काम बारामतीकरांकडून वारंवार केले जात आहे. माढा लोकसभा मतदार संघातून खा.शरद पवार स्वत: रिंगणात उतरणार अशी चर्चा होती. मात्र, तेथून आपला पराभव होऊ शकतो हे ओळखल्यानेच त्यांनी माढ्यातून माघार घेतली आहे. येथील जनतेला पाण्याची आश्‍वासने देवून त्यांनी निवडणुका लढवल्या. मात्र, त्यांना पाण्याचा प्रश्‍न सोडवता आला नाही. पाणी प्रश्‍नावर ही शेवटची निवडणूक असेल, येथून पुढील निवडणूका पाणी प्रश्‍नावर होणार नाहीत, अशी ग्वाही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.

डॉ. दिलीप येळगावकर म्हणाले,  ज्यांनी आपली जिरवली त्यांची जिरवायची वेळ आली आहे. मतदार संघातील पाण्याचा प्रश्‍न गेली अनेक वर्षे झाला प्रलंबीत आहे. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी सर्वांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना सर्वाधिक मतांनी निवडून आणूया व आपल्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी त्यांना दिल्लीला पाठवण्याचा निर्धार करुया, असे आवाहन त्यांनी केले. 

अनिल देसाई म्हणाले, आता जिहे-कटापूरचे पाणी आंधळी तलावात येणे गरजेचे झाले आहे. येथील जनता पाण्यासठी तहानली आहे. जनतेला अनेक वर्षांपासून भेडसावत असणारा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सर्व जनतेने रणजितसिंहाच्या हाताला बळकटी द्यावी व त्यांना उच्चांकी मताधिक्याने निवडूण द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सतीश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचलन केल. संदीप भोसले यांनी आभार मानले.

लढाई संजयमामांशी नसून बारामतीकरांशी...

बारामतीकरांनी एकही शब्द पूर्ण केला नाही. पाण्यापेक्षा पैसा खाण्याकडे यांचे अधिक लक्ष राहिले आहे असा आरोप  रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला. आपल्या भाषणात रणजितसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. आपली लढाई संजय शिंदे यांच्याशी नसून थेट बारामतीकरांशी आहे, असेही ते म्हणाले.