Tue, Jul 14, 2020 02:36होमपेज › Satara › उदयनराजेंना आवरा; अन्यथा पक्षातून बाहेर पडू : रामराजे निंबाळकर 

उदयनराजेंना आवरा; अन्यथा पक्षातून बाहेर पडू : रामराजे निंबाळकर 

Published On: Jun 14 2019 5:58PM | Last Updated: Jun 14 2019 5:58PM
फलटण : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील गृहकलह कमालीचा वाढला आहे. राष्ट्रवादीचेच खा. उदयनराजे भोसले यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर यांच्यावर टोकाची टीका केल्यानंतर रामराजेंनीही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हालाही दोन वर्षे लाल दिवा मिळाला होता. या काळात तुम्ही काय केले? तुम्ही स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणवता आणि एनओसीसाठी लोकांकडून पैसे खाता. असले धंदे आम्ही कधी केले नाहीत, अशा शब्दात त्यांनी उदयनराजेंचा पत्रकार परिषदेत समाचार घेतला. 

उदयनराजेंना आवरा; अन्यथा आम्ही पक्षातून बाहेर पडू, असे मी शनिवारच्या बैठकीत शरद पवार यांना सांगणार असल्याचे जाहीर विधान रामराजेंनी केले. रामराजेंच्या या विधानामुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे चिन्ह आहे. 

निरा-देवघरच्या प्रश्‍नावरून सातार्‍याच्या शासकीय विश्रामगृहावर खा. उदयनराजेंनी रामराजेंवर टिकास्त्र सोडले होते. भगीरथामुळे 14 वर्षे दुष्काळग्रस्तांना वनवास सोसावा लागला. लाल दिवा असून उपयोग काय केला? पाणी दुसरीकडे गेले तेव्हा ते काय करत होते? अशा शब्दात उदयनराजेंनी रामराजेंवर टीका केली होती. त्याला रामराजेंनी फलटणमध्ये पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. 

रामराजे म्हणाले, फलटणमध्ये येऊन बांडगूळ म्हणणार्‍यांनी एक लक्षात ठेवावे की, याच बांडगुळांनी तुमच्या आधीच्या पिढीला सांभाळले होते. उदयनराजेंनी मला स्वयंघोषित भगीरथ म्हटले. मला वाटतं की, ते स्वयंघोषित छत्रपती आहेत. त्यामुळे आपण दोन्ही स्वयंघोषित लोकांनी एकमेकांशी वाद घालणे योग्य नाही. तुम्हाला कधी वेळ मिळाला आणि तुमचं मन थार्‍यावर असेल तर एकदा खंडाळ्याच्या पलीकडे खिंडीजवळ नीरा उजवा कालवा आहे तिकडून उदयनराजेंनी आंदरूडपर्यंत प्रवास करावा. त्यावेळी उदयनराजेंना समजेल की, ज्या भागाला नीरा- देवघर योजनेतील पाणी कधीही मिळू शकत नव्हते, अशा भागापर्यंत 10-15 बोगदे पाडून मी कृष्णेचे पाणी पोहोचवले आहे. त्यामुळे काहीजण मला भगीरथ म्हणत असतील किंवा मी गेली 15 वर्षे लाल दिव्याच्या गाडीतून फिरत असेल तर तुम्हाला दु:ख होण्याचे कारण काय आहे?  असा सवालही रामराजेंनी केला. 

तुम्हालाही दोन वर्षे लाल दिवा मिळाला होता. या काळात तुम्ही काय केले? तुम्ही स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणवता आणि एनओसीसाठी लोकांकडून पैसे खाता. असले धंदे आम्ही कधी केले नाहीत. कोणाविषयी आणि कोणाबरोबर बोलता हे उदयनराजेंनी पहावे. आ. जयकुमार गोरे व खा. रणजितसिंह ना. निंबाळकर व उदयनराजे हे अगोदर एकत्र होते का? सातार्‍यात या अगोदर त्यांचे काय चालत होते. जे टेबलाखाली होते ते वर आले ते माझ्यामुळे आले. असे बरेच आमदार मी अंगावर घेतले आहेत. उलटपक्षी जेवढी माझ्यावर टीका होत आहे तेवढे मला बळ मिळत आहे. कारण माझं मन हे शुध्द आहे. मी कोणाला फसवलेले नाही, असेही ते म्हणाले.

उदयनराजेंनी  जे पुनर्वसनाचे आरोप केले आहेत ते त्यांनी सिध्द करावे. मी तर त्यांच्या मागेच लागणार आहे. नाहीतर तुमचे जावलीचे सर्व बाहेर काढणार आहे. माझ्याकडे याबाबतचे 1 टन  रेकॉर्ड आहे. कराडच्या सभेत माझ्या शेजारी कोण बसले होते ते मला माहित नाही. मात्र, निवडणूक झाल्यावर ते अंगावर येणारच आहेत हे मला माहित होते. जिल्ह्यात जोपर्यंत ही पिसाळलेली राहणार आहेत तोपर्यंत मीही पिसाळलेलाच असणार आहे, हे माझं त्यांना आव्हान आहे, असा इशाराही रामराजेंनी दिला. 

राज्यमंत्री असताना तुम्ही काय काय उद्योग केलेत हे काढले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. याचा विचार उदयनराजेंनी करावा. लोक उशीरा का शहाणे झाले आहेत. त्यांचे अडीच ते पावणे तीन लाखांचे लीड कमी झाले आहे.  उदयनराजेंच्या सातारा तालुक्यातच त्यांना कमी मते पडली आहेत. यावर ते रामराजेंचे नाव घेवून टीका करतात. कधी कोठे काय बोलावे हे त्यांना माहित नाही. शनिवारी होणार्‍या मुंबईतील बैठकीत याबाबत खा. शरद पवार यांच्याकडे तक्रार करणार आहे. या खासदारांना तुम्ही सांभाळा नाहीतर आम्हाला पक्ष सोडायची परवानगी द्या, असे मी सांगणार असल्याचा इशाराही रामराजेंनी दिला. 

उदयनराजे खंडाळ्यापुरते खासदार आहेत. त्यांनी तालुक्यातील किती प्रश्‍न उपस्थित केले? एमआयडीसीसाठी किती मोर्चे काढले हे त्यांनी सांगाव. उदयनराजे आणि पाण्याचा संबध हा मर्यादित आहे. धरणाच्या पाण्याचा वापर कसा असतो हे त्यांना माहित नाही त्यांनी जेवढं समजेल तेवढ बोलावं, असा इशाराही रामराजेंनी दिला.

खा. रणजितसिंहांना पश्‍चाताप होईल त्याला फक्‍त महिना किंवा 15 दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यांना माहितच नाही आपण काय बोललोय ते.  राजकीय उद्दिष्ट वेगळे होते त्यासाठी आमचा बळी दिला गेलाय. त्यांना काय काढायच ते काढू द्या माझं मी काढतो, असेही रामराजे म्हणाले. 

जयकुमारने पनवेलच्या जमिनीत काय काय खेळ केले?

जयकुमारने पुनर्वसनाच्या जमिनीचे काढावे मग मीही त्यांनी पुनर्वसनाच्या पनवेलच्या जमिनीत काय काय खेळ केले हे तुम्हाला दाखवतो, असा इशारा रामराजे यांनी पत्रकार परिषदेत दिला. तर, जाहीर मेळाव्यातही त्यांनी आ. जयकुमार गोरे यांच्यावर टिकास्त्र सोडले. जयकुमार गोरे यांनी कुठल्या तरी एका पक्षाशी इमानदार राहावे. काहीजण अनेक पक्ष बदलत आहेत. तर, काहीजण अनेक बायका बदलत आहेत, असेही रामराजे म्हणाले. 

राष्ट्रवादीची आजची बैठक वादळी ठरणार 

मुंबईत शरद  पवार यांनी शनिवारी सातारा जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बोलावली आहे. विधानसभेच्या तयारीसाठी ही बैठक आहे. मात्र, ही बैठक कमालीची वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. ना. रामराजे ना. निंबाळकर यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. तर, सातारा-जावलीचे आ. शिवेंद्रराजे भोसले हेही पक्षावर नाराज आहेत. तेही या बैठकीत आपल्या भावना आक्रमक मांडणार आहेत. रामराजे व खा. उदयनराजे यांच्यातील वाद बैठकीत टोकाला जाण्याची शक्यता आहे.