Sat, Jan 25, 2020 06:45होमपेज › Satara › रामराजेही लवकरच शिवबंधनात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार

रामराजेही लवकरच शिवबंधनात

Published On: Sep 12 2019 1:52AM | Last Updated: Sep 12 2019 1:52AM
सातारा / फलटण : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांनी पुढची राजकीय वाटचाल व विधानसभा निवडणूक पार्श्‍वभूमीवर फलटणमध्ये शुक्रवार, दि. 13 रोजी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. यापुढे राजकीय वाटचाल कशी करावी व विधानसभा निवडणूक कशी लढवावी? यावर चर्चा होेणार आहे.  रामराजे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार हे निश्‍चित झाले असून, ते लवकरच शिवबंधन बांधत आपल्या समर्थकांसमवेत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे  खात्रीशीर वृत्त आहे.

अनंत मंगल कार्यालयात होणार्‍या या कार्यकर्ता मेळाव्यास फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंंघातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात ना. रामराजे काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे. गेली अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर हे राष्ट्रवादीवर नाराज असल्याचे दिसून आले आहे. विशेषत: रामराजे व उदयनराजे यांच्यातला वाद कायम धूपत राहिला. या संघर्षाने पराकोटीची  सीमा गाठली. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत ते राष्ट्रवादीच्या कोणत्याच कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. त्याचबरोबर खुद्द शरद पवार सातार्‍यात आल्यानंतरही ते त्यांच्या भेटीला गेले नव्हते. यामुळे रामराजे यांच्यावर लक्ष केंद्रित झाले असून ते भाजपमध्ये जाणार का? शिवसेनेत जाणार का? की राष्ट्रवादीतच राहणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. प्रारंभी रामराजे हे भाजपमध्ये जाण्यास उत्सुक होते. परंतु, उदयनराजेंची भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेली चर्चा व खा. रणजितसिंह निंबाळकर, जयकुमार गोरे यांनी केलेला भाजप प्रवेश यामुळे रामराजे काय निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशाला विरोध  आहे. त्या तुलनेत शिवसेेनेकडे जिल्ह्यात सक्षम नेतृत्व नसल्याने ना. रामराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करून आपली प्रतिष्ठा कायम ठेवावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.  रामराजे कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार निर्णय घेतील, असे दिसत आहे.

विधान परिषदेचे सभापतीपद टिकणार...

रामराजे ना. निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. मात्र, सद्य:स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सभागृहातील संख्याबळ घटलेले आहे. त्यामुळेच नीलम गोर्‍हे या विधान परिषदेच्या उपसभापती झाल्या. निवडणुकीनंतर नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर रामराजेंचे पद जाण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यांनी चाणाक्ष खेळी खेळली असून, ते शिवसेनेत गेल्यानंतर हे पद टिकणार आहे. सभागृहात सेना - भाजपचे असलेले वर्चस्व  लक्षात घेता रामराजे 2022 पर्यंत सभापती पदावर राहू शकतात. शिवाय फलटण विधानसभा मतदारसंघही शिवसेनेच्या वाट्याला आहे. रामराजे ना. निंबाळकरांनी ज्या वाई मतदारसंघाचा आग्रह धरला आहे. तोही शिवसेनेकडे आहे. त्यामुळे रामराजे शिवसेनेत जाऊन सातारा जिल्ह्यावरील आपले वर्चस्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतील. ऐनवेळी भाजपही त्यांना आपल्याकडे खेचण्याची खेळी करू शकते. उदयनराजेंचा भाजपमधील प्रवेश प्रलंबित असल्याने विविध शक्यता नाकारता येत नाहीत.