Wed, Jul 08, 2020 09:46होमपेज › Satara › युतीची उमेदवारी शक्य : भाजपच्या भूमिकेमुळे सस्पेन्स

पुरुषोत्तम जाधव पुन्हा सेनेत

Published On: Mar 17 2019 1:48AM | Last Updated: Mar 17 2019 1:48AM
सातारा : प्रतिनिधी

सातारा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते व नंतर भाजपमध्ये गेलेले पुरुषोत्तम जाधव यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवबंधन बांधून शिवसेनेत पुन्हा जाहीर प्रवेश केला. सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने जाधव यांना शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपने अद्यापही मतदारसंघावरील दावा सोडला नसल्याने सस्पेन्स वाढला आहे.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विविध प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली असून त्यांच्याकडून प्रचाराची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मात्र, काही पक्षांकडून अद्याप चाचपणी सुरू असून भूमिका स्पष्ट केलेली नाही. उमेदवारी अर्ज भरायला दहा-बारा दिवसांचा कालावधीच शिल्लक राहिल्याने राजकीय घटना घडामोडींना वेग आला आहे. पुरुषोत्तम जाधव हे पूर्वी शिवसेनेत होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभेची व विधानसभेची पहिली निवडणूक ते लढले होते. दुसरी निवडणूक मात्र ते अपक्ष लढले. सध्या ते भाजपमध्ये होते.  लोकसभा निवडणुकीसाठी ते पूर्वीपासून इच्छुक आहेत. ते शिवसेने प्रवेश करणार अशी चर्चाही राजकीय पटलावर सुरु होती.  

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पुरुषोत्तम जाधव यांनी शनिवारी भेट घेवून जाहीर प्रवेश केला. ठाकरेंनी त्यांना शिवबंधन बांधून  पक्षात घेतले. यावेळी  परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते, पशुसंवर्धन मंत्री ना. अर्जुनराव खोतकर, शिवसेनेचे सचिव  खा. अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे उपनेते व  कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. नितीन बानुगडे-पाटील प्रमुख उपस्थित होते. 

सातारा लोकसभा मतदार संघावर शिवसेना प्रबळ दावेदार राहिली आहे. उमेदवारीबाबत सेनेने अद्यापही मौन बाळगले आहे. असे असेल तरी सेनेतून पुरुषोत्तम जाधव यांना उमेदवारी मिळाली  तर त्यांचा सामना राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार खा. श्री. छ. उदयराजे भोसले यांच्याशी होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीतही खा. उदयनराजे भोसले विरुध्द पुरुषोत्तम जाधव अशी सरळ लढत झाली आहे. सेनेने जाधव यांना उमेदवारी दिल्यास पुन्हा हा सामना रंगण्याची शक्यता आहे.  भाजपने अद्यापही मतदार संघावरील दावा सोडला नसल्याने सस्पेन्स वाढला आहे.

दरम्यान, ना. नितीन बानुगडे-पाटील यांना विचारले असता ते  म्हणाले, सातारा लोकसभेची जागा शिवसेनेकडेच आहे यामध्ये पूर्वीपासून आतापर्यंत कोणतीही शंका राहिलेली नाही. शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे हे उमेदवारीसंदर्भात निर्णय घेणार आहेत.  त्यांच्यासोबत मुंबईत बैठक झाली मात्र,  उमेदवारीबाबत चर्चा झालेली नाही.  बैठकीत पश्‍चिम महाराष्ट्रातील  लोकसभा मतदारसंघातील रणनीती-संदर्भात चर्चा  झाली. दोन-तीन दिवसांत उमेदवार जाहीर केले जाणार आहेत. भाजप पदाधिकार्‍यांसोबत समन्वय ठेवून प.  महाराष्ट्रात प्रचाराचे नियोजन करण्यात येणार आहे. अंबाबाईचा आशीर्वाद घेवून कोल्हापूर येथून दि. 24 रोजी प. महाराष्ट्रातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारास सुरुवात केली जाणार  असल्याचे ना. बानुगडे-पाटील यांनी सांगितले.