Wed, Jul 15, 2020 17:57होमपेज › Satara › बहुजनांचे सरकार आणण्यासाठी उदयनराजेंना साथ द्या : आ. चव्हाण

न्यायालय व आयोगाकडून सरकारला चपराक : आ. पृथ्वीराज चव्हाण

Published On: Apr 14 2019 12:20AM | Last Updated: Apr 14 2019 12:20AM
उंब्रज : वार्ताहर

मोदींवरील सिनेमा, मोदी टीव्ही वाहिनी यांना निवडणूक आयोग व न्यायालयाने निवडणुका होईपर्यंत घातलेली बंदी म्हणजे या सरकारला दिलेली चपराक आहे, सर्वसामान्य शेतकरी आणि बहुजनांचे सरकार आणण्यासाठी उदयनराजेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.  

पाल, ता. कराड येथे झालेल्या  सभेत  ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, चंद्रकांत जाधव, अजितराव पाटील- चिखलीकर, मानसिंगराव जगदाळे, बाळासाहेब सोळस्कर, जि.प. सदस्या सुरेखा जाधव, आण्णासाहेब पलंगे आदी प्रमुख उपस्थित होते.

भाजपच्या विरोधात आम्ही एकजूट दाखवल्याने आणि अपवाद वगळता एकास एक उमेदवार दिल्याने काँग्रेस व मित्रपक्षांचे सरकार सत्तेवर येईल, हे केवळ माझे भाकीत नाही, तर राजकीय विश्‍लेषकांचा  अंदाज आहे, असा विश्‍वास व्यक्त करून आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,  सन  2014 च्या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला अवघी  31 टक्के मते मिळाली आहेत.  मतविभाजनामुळे आपला तोटा होत असल्याचे लक्षात आल्याने  विरोधातील  65 ते 69 टक्के  मतांची  मोट बांधल्याने  निश्‍चितच देशात परिवर्तन घडेल, भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेले हे सरकार भ्रष्टाचाराने सर्वाधिक बरबटलेले आहे. राफेल विमान खरेदी हे याचे एक ज्वलंत उदाहरण आहे. 526 कोटीचे एक विमान  1760 कोटींना खरेदी करण्यात आले. अशा  36 विमानांच्या खरेदीत 
किमान 36 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला. 

खा. उदयनराजे भोसले म्हणाले, जनतेने मनात आणले तर काहीही घडू शकते. मात्र त्यासाठी एकजूट हवी. देशात अमुक तमुकची लाट आहे, असे म्हणणं चुकीचं आहे. कारण लाट फक्त आणि फक्त समुद्राचीच असते. जर जनतेने मनात आणले तर समोरील व्यक्ती आणि सरकार लट लट कापल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे लोकशाहीतील खरे राजे असणार्‍या जनतेने या निवडणुकीत परिवर्तन घडवावे.  मन की बात करीत सत्ता मिळवलेल्या या सरकारने हातामध्ये सत्ता येताच घेतलेल्या अविचारी निर्णयांमुळे जनतेची अक्षरशः धुळदान केलेली आहे. सत्तेत गेल्यावर जनतेला विसरणार्‍या सरकारला धडा शिकवण्यासाठी सत्तांतराशिवाय पर्याय नाही. 

आ शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, शेतक-यांच्या हिताची भूमिका शरद पवार यांनी कायम घेतली. त्यांना ताकद देण्याने शेती आणि शेतकर्‍यांचे भले होणार आहे. जिल्ह्यात कोणाच्या हातात सूत्रे द्यायची याचा निर्णय या निवडणुकीत घ्यायचा आहे. 

आ. शशिकांत शिंदे यांनी देशात सर्वाधिक मताधिक्य उदयनराजेंना मिळावे हे साकडं खंडेरायाला घालायला इथं आलो. ‘अब की बार फिर नही मोदी सरकार’  हे लोकांनी आता ठरवलं आहे, असे सांगितले.
आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, देवराज पाटील, अजितराव चिखलीकर, बाळासाहेब सोळस्कर यांची भाषणे झाली.

तर भुवयाही काढून टाकेन : उदयनराजे

जनतेने आजवर विश्‍वास ठेवला व मला निवडून दिले. तोच विश्‍वास पुन्हा एकदा ठेवून बघा. तो सार्थ न ठरल्यास मिशाच काय पण भुवयाही  काढून टाकेन, असे खा. उदयनराजे यांनी त्यांच्या  भाषणात सांगताच टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला.