Sat, Jul 11, 2020 13:29होमपेज › Satara › आयुष्याच्या परीक्षेमध्ये नियतीने त्याला हरविले!

आयुष्याच्या परीक्षेमध्ये नियतीने त्याला हरविले!

Published On: Feb 25 2018 1:13AM | Last Updated: Feb 25 2018 1:13AMतळमावले : नितीन कचरे 

मराठीचा बारावीचा पेपर  प्रथमेशसाठी आयुष्याचा शेवटचा पेपर ठरला. आयुष्याच्या परीक्षेमध्ये नियतीने त्याला हरविले. परीक्षा संपेपर्यंत प्रथमेश रिकामा बेंच शिक्षकांसह त्याच्या मित्रांच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. 

काकासाहेब चव्हाण महाविद्यालय तळमावले (ता. पाटण) या कॉलेजमध्ये बारावी कॉमर्स या वर्गामध्ये शिकणारा प्रथमेश परशराम पाटील (रा. कदमवाडी, मोरेवाडी कुठरे ता. पाटण) हा मराठी विषयाचा पेपर देऊन घरी परतत असताना पाचुपतेवाडी (गुढे) या ठिकाणी झालेल्या  अपघाता मध्ये  गंभीर जखमी झाला. कराड येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच मोरेवाडी गावावरती शोककळा पसरली. 

असे म्हणतात बारावीची परीक्षा आयुष्याला कलाटणी देणारी परीक्षा असते. परंतु, प्रथमेशच्या बाबतीत त्याची ती परीक्षा आयुष्याची शेवटची परीक्षा ठरली. आयुष्याच्या परीक्षेमध्ये नियतीने त्यास हरविले. मराठीच्या पेपरनंतर येणार्‍या पुढील प्रत्येक पेपरला प्रथमेशचा तो रिकामा बेंच परीक्षकांसाठी आणि त्याच्या जीवलग  मित्रांसाठी डोळ्यामध्ये पाणी आणल्या शिवाय राहणार नाही. बाळा आजचा पेपर कसा गेला? असे आपुलकीने विचारपूस करणारे त्याचे आईवडील आता तो प्रश्‍न कोणाला विचारणार त्यांच्या वरती दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वैर्‍यावरती जी वेळ येऊ नये ती त्यांच्यावरती आली आहे.

प्रथमेशचा अपघात जर अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये झाला असेल तर पोलिसांनी त्या वाहनाचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळाव्यात तरच येथून पुढे  प्रथमेशसारखी अर्ध्यावर आयुष्याची परीक्षा ठेवून जाण्याची वेळ दुसर्‍या युवकांवर येणार नाही.