Wed, Jul 08, 2020 08:47होमपेज › Satara › ‘टीम एलसीबी घनवट’कडून कारवाईचा ‘डोंगर’

‘टीम एलसीबी घनवट’कडून कारवाईचा ‘डोंगर’

Published On: Nov 02 2018 1:13AM | Last Updated: Nov 01 2018 10:31PMसातारा : विठ्ठल हेंद्रे

महाराष्ट्र पोलिस दलात सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचा (एलसीबी) नावलौकीक केलेल्या पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांची अखेर साडेचार वर्षानंतर बदली झाली.  ‘टीम घनवट’ यांनी केलेल्या कारवाईच्या आकड्यांचा अक्षरश: ‘डोंगर’ झाला आहे. 42 खून, 31 दरोडा व दरोडा तयारी, फसवणूक, 588 जबरी चोरी, चोरी, घरफोडी या गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांच्या पथकाला यश आले आहेे. तसेच एकूण 1410 आरोपींना अटक केल्यामुळे  गुन्हेगारांना त्यांच्या कार्यपद्धतीची धडकी भरली आहे.

पोनि पद्माकर घनवट यांनी 11 जून 2014 साली सातारा एलसीबीचा चार्ज घेतला. गेली चार वर्षे ते व त्यांचे पथक प्रसंगानुसार प्रसंगी रात्रंदिवस काम करत होते. दोन वर्षानंतर अधिकार्‍याची बदली होती. मात्र घनवट यांच्या टीमने एक सो एक कारवाईचा धडाका केल्याने पोनि पद्माकर घनवट यांना कार्यकाला व्यतिरिक्‍त अडीच वर्षे ज्यादा काम करता आले. कामाची चिकाटी, जिद्द,  बहुतेककरुन प्रत्येक गुन्ह्याची उकल यामुळे दोन्ही तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी त्यांनाच ‘प्रेफर’ करत कामात फ्री हॅन्ड दिला. टीम घनवट यांनी हाच विश्‍वास सार्थ ठरवत सातारा जिल्हा पोलिस दलाअंतर्गत असलेल्या एलसीबीला अत्युच्च उंचीवर नेवून ठेवले.

बेस्ट रनर, क्रिकेटर, जीम प्लेअर, हळवा माणूस..

पोनि पद्माकर घनवट यांचे वय सध्या 52  आहेे. ते दररोज न चुकता मैदानावर येतात. व्यायामाच्या बाबतीत हा अधिकारी कमालीचा भन्‍नाट आहे. साडेचार वर्षात मॅरेथॉनच्या सुमारे दहा स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. पोलिसांच्या धावण्याच्या स्पर्धेत ते प्रथम आलेले आहेत. धावपटू बरोबरच क्रिकेटचाही त्यांना दांडगा नाद असून बॉलिंग करण्यासाठी ते आग्रही राहतात. या दोन्ही क्रिडापेक्षात ते जीमला अधिक प्राधान्य देतात. दरम्यान, एलसीबी विभागात नेहमी घुटमळणारा व थोडं बोबड बोलणारा ‘राजा’ हा सर्वांना परिचित झाला आहे. राजाला घरदार नाही. तो रस्त्यावर भिक मागून संपून जाईल असा विचार आल्याने घनवट हळवे बनले. जगण्याचे बळ देण्यासाठी त्यांनी त्याला ऑफिस व परिसरातील झाडलोट करण्याचे काम दिले. त्याबदल्यात त्याला जेवण व सणादिवशी कपडे दिली जातात. रस्त्यावर फिरणार्‍या या राजाचे एकप्रकारे पुर्नवसनही झाले आहे.

42 पिस्तूल, मांडूळ, बनावट नोटांचा खजिना..

पोनि पद्माकर घनवट यांचे सातारा जिल्ह्यातील नेटवर्क थक्‍क करणारे होते. साडेचार वर्षात विविध कारवाईमधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 42 पिस्तूल जप्‍त करण्यात आल्या आहेत. मांडूळ तस्करीचे 4 गुन्हेही उघडकीस आणण्यात यश आले आहे. बनावट नोटांच्या माध्यमातून भारताची आर्थिक घडी विस्कटण्याच्या प्रयत्न करणार्‍यांचा डावही त्यांनी हाणून पाडला आहे. बनावट नोटाप्रकरणीही त्यांच्या उल्‍लेखनीय कारवाई राहिल्या असून त्यामध्ये 50 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्‍त करण्यात आल्या आहेत.

वाई हत्याकांड, मराठा मोर्चा, चिंचणेर वंदन प्रकरण..

पोनि पद्माकर घनवट यांच्या कालावधीत अनेक संवेदनशील घटना घडल्या आहेत. डॉ.संतोष पोळ याने केलेल्या सहा खुनाचा छडा हा महत्वपूर्ण छडा मानला जातोय.  याशिवाय मराठा मोर्चाचे आयोजन, आंदोलन यावेळी पोलिस अधीक्षकांसोबत पोनि घनवट यांची व्यूहरचनाही जिल्हावासियांनी पाहिली आहे. चिंचनेर वंदन येथील दंगलीप्रकरणातही एलसीबीने केलेल्या हालचाली महत्वाच्या आहेत. याशिवा दरवर्षी विठू माउलीच्या दिंडीत वारकरी होवून दिंडीचा सहकार्‍यांसोबत आनंद घेत अबाधित ठेवलेली कायदा व सुव्यवस्था मोलाची ठरली आहे.