Tue, Jun 15, 2021 12:49होमपेज › Satara › गॅदरिंगच्या आनंदावर ड्रेपरीचे विरजण

गॅदरिंगच्या आनंदावर ड्रेपरीचे विरजण

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 8:48PMसातारा : मीना शिंदे

सध्या शाळा - महाविद्यालयांमध्ये गॅदरिंगचे वारे वाहू लागले आहे. या गॅदरिंगसाठी लागणार्‍या ड्रेपरीसाठी व्यावसायिकांकडून पालकांची लूट होत असल्याने  कलामहोत्सवाच्या आनंदाला  गालबोट लागत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. तसेच गॅदरिंगच्या  आनंदावर ड्रेपरीच्या अवाढव्य किंमतीमुळे विरजण पडत आहे.

डिसेंबर, जानेवारी हा गॅदरिंगचा हंगाम असतो. जिल्ह्यात सध्या सर्वच शाळांमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. अगदी प्ले ग्रुपपासून ते शाळा-महाविद्यालयांपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना आपले क्रीडा, कला कौशल्य सादरीकरणासाठी व्यासपीठ मिळत असल्याने कौतुकाची पर्वणी  असते. या सर्व आनंदाच्या सोहळ्यांना ड्रेपरीनावाचे गालबोट लागत असल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. शाळा - महाविद्यालयांच्या  गॅदरिंग व  कलामहोत्सवांमधील कार्यक्रमांमध्ये सादरीकरणापेक्षा वापरल्या जाणार्‍या वेशभूषेला म्हणजेच ड्रेपरीला महत्व दिले जात आहे. कार्यक्रमामध्ये विद्यार्थी ग्रुपने आपले नृत्याविष्कार, नाटिका तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करतात.  तसेच पारंपारिक नृत्यांवर भर दिला जात आहे.

या कार्यक्रमामध्ये सहभागी सर्व कलाकारांच्या वेशभूषेसाठी  साम्य दिसण्यासाठी  प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी भाड्याने ड्रेपरी बुक केली जाते. त्यामुळे ड्रेपरी व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. या ड्रेपरीवर मॅचिंग ज्वेलरीचीही मागणी होत असल्याने त्याचेही भाडे आकारले जावू लागले आहे. या संधीचा ड्रेपरी व्यवसायिक मात्र गैरफायदा घेत आहेत.  मागणी वाढल्यामुळे ड्रेपरी व्यावसायिकांकडून पालकांची लूट केली जात आहे. जास्त भाडे असल्याची तक्रार पालकांनी करताच त्यांना दुरुत्तरे केली जात आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शेतकरी नृत्य, भांगडा अशा पारंपारिक नृत्यांसाठी पारंपारिक डे्रपरी  विकत घेण्याचीच गळ घालतात.  

यामध्ये विशेषत:  शेतकरी गीतासाठी लागणारे, धोतर, बंडी, मुंडासे अशा  ड्रेपरीचा समावेश आहे. तसेच नेहरु कुर्ता व पायजमा ही ड्रेपरी बर्‍याचदा विकत घेण्याची गळ घातली जाते. ती पुरवठा करताना त्या कपड्यांच्या दर्जापेक्षा जास्त किंमत पालकांना  मोजावी लागते. तसेच काही शाळा महाविद्यालयांची  विद्यार्थी संघांची कलामहोत्सवामध्ये निवड झाली आहे, असे संघ ड्रेपरी भाड्याने घेण्यापेक्षा विकत घेणे पसंत करतात. अशावेळी  ही ड्रेपरी पुरवणारे  ठेकेदार ज्यादाचे पैसे वसूल करत आहेत.  ड्रेपरी व्यावसायिक व शैक्षणिक संस्था यांचेही यामध्ये साटेलोटे असल्याने सर्व भुर्दंड पालकांना सोसावा लागत आहे. 

पालकांना होतोय भुर्दंड

ऐतिहासिक वेशभूषा : प्रत्येक वस्तूचे वेगळे भाडे 
पारंपारिक कपडे खरेदी करण्याची गळ घातली जाते
मॅचिंग ज्वेलरीसाठी वेगळे पैसे आकारले जातात
ड्रेपरी व्यावसायिक व शाळा व्यवस्थापनामध्ये साटेलोटे