Wed, Jul 08, 2020 16:24होमपेज › Satara › पवारांनी मला राजकारण शिकवू नये: उद्धव ठाकरे

'शरद पवारांनी मला राजकारण शिकवू नये'

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

‘पवारसाहेब तुम्ही मोदींचे गुरू आहात, त्यांना जरूर राजकारण शिकवा. मला राजकारण शिकवू नका. तुमच्याकडून मी राजकारण शिकू इच्छित नाही. माझे गुरू फक्‍त माझे वडीलच आहेत. स्वत:च्या पक्षात राहून स्वत:च्या नेत्याच्या पाठीत वार करून मुख्यमंत्रिपदी बसणारे तुम्ही आमच्यावर टीका करू नका, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खा. शरद पवार यांना लगावला.

कराडमधील शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री विजय शिवतारे, खा. गजानन कीर्तीकर, आ. शंभूराज देसाई, आ. राजेश क्षीरसागर, संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, माजी आ. दगडू सपकाळ, जिल्हाप्रमुख हर्षल कदम, डी. एम. बावळेकर, चंद्रकांत जाधव,  विनायक भोसले, शशिकांत हापसे, किरण भोसले उपस्थित होते. 

राष्ट्रवादीवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, शनिवारी येथे हल्लाबोल केला. कशावर हल्ला? कोण बोलणार? तुमची लायकी आहे का हल्लाबोल करायची? शेतकरी कर्जमुक्‍त झाला पाहिजे म्हणून तुम्ही हल्ला बोलणार का? अजित पवारांनी सोलापूरच्या शेतकर्‍याला दिलेले उत्तर शेतकरी विसरला नाही. आता तुम्ही तुमचा मुखवटा बदलला, म्हणून स्वभाव बदलत नाही. शेतकर्‍यांचे कैवारी असता, तर तुम्हाला सत्तेवरून जा, असे शेतकर्‍यांनी सांगितलेच नसते, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. तसेच जे 70 हजार कोटी ओरबडून खाल्ले, त्याचा अगोदर हिशेब द्या आणि मग तुम्ही हल्ला बोला. 

कन्‍नडी शाळांना अनुदान

जत महाराष्ट्रात असूनही तेथील मराठी शाळांना सरकार अनुदान देत नाही. मात्र, तेथील कन्‍नडी शाळांना कर्नाटक सरकार अनुदान देते. मग मी महाराष्ट्र सरकारचा उदो उदो करायचा का? महाराष्ट्रात राहायचे, तर मराठी आलीच पाहिजे, असे ठणकावून सांगणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रात असला पाहिजे. तसा मुख्यमंत्री फक्‍त शिवसेनाच देऊ शकते. एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच.  त्यावेळीही मी तुमच्याबरोबर राहणार आहे. मला मुख्यमंत्री व्हायचे नाही. 

सध्या रेडिओ लावला की मन की बात सुरू होते. दुसर्‍याला मन नाही का? गुजरातमधील व्यापारी रस्त्यावर उतरल्यानंतर तेथील ‘जीएसटी’ कमी होतो. महाराष्ट्रातील शेतकर्‍याला कर्जमाफी करण्यासाठी मर्द मराठा मावळ्यांनीही रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी. शेतकर्‍यांसाठी लढत असताना मी सर्वात पुढे असणार आहे. मी सत्तेच्या खुर्चीला बांधील नाही. मी शेतकर्‍यांबरोबर राहणार आहे. गुजरातच्या निवडणुकीसाठी देशाचा कारभार बाजूला ठेवून सर्वजण गुजरातकडे पळत आहेत, असा टोलाही ठाकरे यांनी मोदी सरकारला लगावला. यावेळी रणजितसिंह देशमुख, छायाताई शिंदे, जयवंत पाटील, रणजित भोसले, मारुती घोलप, उद्धव घोलप, विकास घोलप, पांडुरंग घोलप, तात्यासाहेब घाडगे, सतीश पाटील उपस्थित होते.

यशवंतरावांचे राजकारण यांना माहीत तरी आहे का?

स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. वसंतदादा पाटील यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. अभिमान वाटावा, अशा या दोन व्यक्‍ती होत्या. परंतु, येथे येऊन मुख्यमंत्री म्हणतात की, आम्ही चव्हाणसाहेबांच्या विचारांचे सर्जनशील राजकारण करीत आहोत. यशवंतरावांचे राजकारण त्यांना माहीत तरी आहे का? या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला होता. मात्र, सध्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा नव्हे, तर स्वत:च्या पक्षाच्या हिताचा विचार करत आहेत. महाराष्ट्र नव्हे, तर पक्ष मोठा झाला पाहिजे, ही त्यांची सर्जनशीलता आहे का? असा प्रश्‍न उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला.