Sat, Jul 04, 2020 00:56होमपेज › Satara › शरद पवारांना बिनविरोध करा;उदयनराजेंना राज्यसभेवर घ्या आ.शशिकांत शिंदे

शरद पवारांना बिनविरोध करा;उदयनराजेंना राज्यसभेवर घ्या आ.शशिकांत शिंदेc

Published On: Sep 25 2019 1:47AM | Last Updated: Sep 24 2019 11:19PM
सातारा : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाने दिलेल्या वचनानुसार श्री. छ. उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर खासदार करावे व मंत्रिपद द्यावे. तसे झाले तर सातारा मतदार संघातून शरद पवार बिनविरोध निवडून येतील व सर्वच प्रश्‍न सुटतील, असा टोला आ. शशिकांत शिंदे यांनी उदयनराजेंच्या वक्‍तव्यावर लगावला. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघात उमेदवारी जाहीर केली तर लोकसभेचा अर्ज दाखल करणार नसल्याचे भावनिक वक्‍तव्य उदयनराजे भोसले यांनी केल्यानंतर आ. शिंदे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, उदयनराजे भोसले यांची भावनिकता यापूर्वी आम्ही पाहिलेली आहे. त्यांनी शरद पवार यांच्याबरोबर राहावे, अशी आमची सर्वांची इच्छा  आणि तळमळ होती. मात्र, दुर्दैवाने तसे  काही झाले नाही. प्रेम व आपुलकी ही सर्वत्र असते. परंतु, भाजपने ज्या पद्धतीने खेळी करून रणनीती आखली, यामुळे मतदार संघात मोठ्या प्रमाणात उमेदवार व शासकीय यंत्रणेवर ताण आला आहे. भाजपची महाजनादेश सातारा जिल्ह्यातून गेल्यानंतर राष्ट्रवादीची रॅली व सभा झाली. 

यावेळी शरद पवारयांना जनतेने दिलेला पाठिंबा व उत्स्फूर्त प्रतिसाद हा भाजप सरकार विरोधात असलेल्या तीव— नाराजीचे प्रतीक आहे. पवार यांच्यासाठी स्वयंस्फूर्तीने उसळलेला महासागर राज्याच्या राजकारणात वेगळ्या प्रकारची जिद्द निर्माण करणारा आहे. शिंदे पुढे म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनीच लढावे, असा आग्रह वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व आमचाही आहे. आम्ही फक्‍त आग्रह करू शकतो. निर्णय हा शरद पवार हेच घेणार आहेत. उमेदवारीबाबत पवार यांनी काही निर्णय घेतल्यास याबाबत कार्यकर्त्यांना कळवले जाईल. 

उदयनराजेंनी शरद पवार हे माझ्यासाठी आदरणीय असून त्यांनी उमेदवारी जाहीर केल्यास अर्ज मागे घेणार असल्याचे सांगितले आहे. भाजपने उदयनराजेंबाबत मोठेपणा दाखवला आहे. त्यांनी उदयनराजेंना दिलेल्या वचनानुसार राज्यसभेवर घेवून त्यांना मंत्रिपद  द्यावे. असे झाल्यास शरद पवार बिनविरोध होवून सर्व प्रश्‍न सुटतील, असा टोला शिंदे  यांनी लगावला.