Wed, Sep 23, 2020 08:51होमपेज › Satara › चेकनाक्यात ट्रक घुसला; ट्रकखाली सापडलेले पोलिस कर्मचारी सुदैवाने बचावले

चेकनाक्यात ट्रक घुसला; ट्रकखाली सापडलेले पोलिस कर्मचारी सुदैवाने बचावले

Last Updated: Aug 03 2020 2:08PM
कराड: पुढारी वृत्तसेवा 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील मालखेड येथे उभारण्यात आलेल्या चेकनाक्यांमध्ये माल ट्रक घुसला. सोमवारी (दि. ३) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात ड्युटीवर असणारे शिक्षक किरकोळ जखमी झाले असून ट्रकच्या खाली सापडलेले पोलिस कर्मचारी सुदैवाने बचावले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना जिल्हा बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. याकरिता कराड तालुक्‍याच्या हद्दीमध्ये पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मालखेड येथे पोलीस प्रशासनाने चेक नाका उभारला आहे.

गेली चार महिन्यांपासून हा चेक नाका कार्यरत असून येथे ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाते. त्यासाठी येथे कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी तसेच वाहनांच्या नोंदी ठेवण्यासाठी शिक्षक ड्युटीवर असतात. विनापरवाना कोणतेही वाहन येथून सोडले जात नाही. अशाच प्रकारे सोमवारी सकाळी मालखेड येथील चेक नाक्यावर पोलिस व शिक्षक ड्युटी बजावत असताना काहीजण महामार्गाच्या कडेला उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये थांबले होते. 

दरम्यान, सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे इचलकरंजीहून पुणे बाजूकडे निघालेला मालट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पोलिसांनी उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसला. या अपघातात शिक्षक किरकोळ जखमी झाला तर पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. दारूच्या नशेत ट्रक चालवल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. 

ट्रकखाली सापडूनही पोलिस सुखरूप

मालखेड येथे चेक नाक्यावर ड्युटी बजावत असताना काही पोलिस कर्मचारी पत्र्याच्या शेडमध्ये थांबले होते. यावेळी अचानक भरधाव वेगात आलेला ट्रक पोलिस कर्मचारी थांबलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसला. काही कळायच्या आतच ट्रकने संपूर्ण पत्र्याचे शेड उद्ध्वस्त केले. प्रसंगावधान राखत पोलिस कर्मचारी जमिनीवर कोसळला. त्याच दरम्यान त्याच्या अंगावरून ट्रक पुढे गेला. मात्र ट्रकची चाके बाजूला असल्याने पोलिस कर्मचारी सुदैवाने बचावले. त्याच्या अंगाचा थरकाप होत होता. इतर पोलिस कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी ट्रक थांबल्यानंतर त्यांना मदतीचा हात देऊन बाहेर काढले.

 "