Tue, Jul 07, 2020 18:17होमपेज › Satara › शिवसागर भेगाळला... 

शिवसागर भेगाळला... 

Published On: May 25 2018 1:12AM | Last Updated: May 24 2018 8:00PMसातारा : सुनील क्षीरसागर 

‘शिवसागर’ जलाशय म्हणजे सातारा जिल्ह्यातील निसर्गदेवतेच्या मुकुटात विराजमान झालेला अद्भूत मणी..! या ‘शिवसागर’ जलाशयावरच या परिसरातील मानवाचे अवघे जीवन अवलंबून असून यावर्षीच्या प्रखर उन्हाळ्याने जलाशयाची पातळी खोलवर गेल्याने परिसरातील जनजीवन ठप्प झाले आहे. ‘शिवसागर’जलाशयावरच अनेकांचे जीवन अवलंबून आहे. या परिसरातील गावे छोटी छोटी असली तरी अनेकांचा व्यवसाय जलाशयातील पाण्यावरच अवलंबून आहे. जलाशयाची पातळी कमी झाल्यामुळे ‘नौकाविहार’ जाग्यावरच थांबला आहे. कमी पाण्यामुळे नौकाविहार नसल्याने बोटी जाग्यावर स्तब्ध असून पर्यटकांची पावलेही ‘शिवसागर’पासून दूर गेली आहेत..!

‘शिवसागर’ जलाशयातून पाण्याची पातळी खाली खोलवर गेल्यामुळे जलाशयातील रेती अर्थात जमीन प्रखर उन्हाने भेगाळल्याचे दिसून येत आहे. जलाशयातील छोट्या जलचरांचे विश्‍व उद्ध्वस्त झाले असून दिवसेंदिवस तप्त होणार्‍या धरतीमुळे अवघा जलाशय ‘गोठून’ जाण्याच्या स्थितीमध्ये आला आहे. निसर्गातील ऋतूचक्रावरच तर अवघ्या पृथ्वीचे जीवन तरते आहे. यावर्षी सर्वांचाच जीव हैराण करणारा उन्हाळा आता संपत आल्याने जलाशयातील पाण्याने नि:श्‍वास सोडला असून या परिसरातील गावागावांतील माणूस आता शेतामध्ये रमला आहे. पावसाळ्यासाठी लागणारा लाकूडफाटा गोळा करणे, उद्याच्या जीवनासाठी भातशेती तापवणे आदी कामे कष्टकरी लोकांनी सुरू केली आहेत. कारण वर्षाऋतू जवळच येऊन ठेपला आहे. हवामान खाते ‘तो’ अंदमानजवळ आल्याचे सांगत असले तरी हवामान खात्याच्या अंदाजावर पाऊस तरी विश्‍वास ठेवतो का हो? दरवर्षी पाऊस हवामान खात्यालाच चकवा देतोय!

‘शिवसागर’ जलाशयाच्या परिसरात वर्षाऋतूमध्ये अखंड वर्षा कोसळते. एवढी घनघोर होते की समोरासमोरील माणूसही एकमेकांना दिसत नाही. डोंगरांवरून, शेताभातांमधून, दर्‍याखोर्‍यांतून गरजत येणार्‍या अवखळ पाण्याच्या वेगाने ‘शिवसागर’ जलाशय ‘भरून’ पावतो. वर्षा थांबल्यावर  कधी तरी मग डोक्यावर इरलं घेऊन घराघरांतून माणूसमेळा बाहेर पडतो. मग भातशेतीच्या इवल्या कोंबांना जमिनीमध्ये सोडून दिलं जातं आणि काही दिवसाने हीच धरती पुलकित होऊन उठते; पण आता हा जलाशय भेगाळला आहे. त्यातील तप्त झालेली माती आता वर्षाऋतूची आतुरतेने वाट पाहत आहे !