Thu, Jul 02, 2020 17:39होमपेज › Satara › विलीनीकरणाबाबत सर्वांशी चर्चा करणे गरजेचे : खा. उदयनराजे

विलीनीकरणाबाबत सर्वांशी चर्चा करणे गरजेचे : खा. उदयनराजे

Published On: Jun 01 2019 2:03AM | Last Updated: Jun 01 2019 2:03AM
सातारा : प्रतिनिधी

विलीनीकरणाबाबत आम्हाला काही माहीत नाही. याबाबत चर्चा झालेली नाही. जो काय निर्णय घेतला जाईल तो चर्चा करूनच घेतला जाईल. जर विलीनीकरण करायचे झाले तर ते कोणाबरोबर करावे व का करावे याबाबत चर्चा होणे गरजेचे आहे, असे मत खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्‍त केले.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यानंतर देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची गुरुवारी दिल्लीत बैठक झाली. या दरम्यान काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होण्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या वृत्ताचे खंडण केले.

अहमदनगर येथे एका वृत्तवाहिनीशी प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. खा. उदयनराजे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलिनीकरणासंदर्भात माझ्याशी चर्चा झाली नाही.  जो काही निर्णय होईल तो सर्वांशी चर्चा करुनच होईल.लोकसभा निवडणूक निकालावर बोलताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश कसे मिळाले, का मिळाले, कशासाठी मिळालं, लोकांनी त्या परिने मतदान केलं का नाही केल. इव्हीएमचा पण विषय आहे, असे वक्‍तव्य करुन खा. उदयनराजे यांनी इव्हीएम मशिनबाबत शंका उपस्थित केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पुण्य श्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाबाबत निवेदन देणार आहे. तसेच धनगर समाजाची असणारी आरक्षणाची मागणीही रास्त असून शासनाने त्याचा विचार करुन धनगर समाजाला आरक्षण लवकरात लवकर द्यावे, असे सांगितले.