Tue, Aug 04, 2020 23:02होमपेज › Satara › पीक कर्जात राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

पीक कर्जात राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Published On: Jul 25 2019 1:51AM | Last Updated: Jul 24 2019 8:44PM
सातारा: महेंद्र खंदारे

खरीप हंगाम सुरू होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून दिलेल्या उद्दिष्टापैकी निम्म्या रकमेचे पण कर्ज वाटप झालेे नसल्याचे आकडेवारी समोर आली आहे. यंदाच्या हंगामात राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांना 711 कोटी 60 लाख रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी अवघे 104 कोटी 36 लाख रूपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उद्दिष्ट 1000 कोटी रूपयांचे असताना 1 हजार 48 कोटी 26 लाख रूपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर असल्याचे दिसून येते. 

जून महिन्याच्या मध्यावर खरीप हंगामाला सुरूवात होते. जुलै महिन्यातही यंदा पावसाने सरासरी गाठली नसल्याने जिल्ह्यात फक्‍त 44.51 टक्के पेरणी झाली आहे. या पिकांच्या लागवडीपासून ते तोडणीपर्यंत येणारा खर्च उभा करण्यासाठी शेतकरी विविध बँकांकडून कर्ज घेतात. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांमध्ये 6 टक्के व्याजदराने हे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तर जिल्हा बँकेमध्ये हेच कर्ज चक्‍क 0 टक्के व्याजदाराने दिले जाते. आता खरीप हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्यास आला असतानाही पीक कर्जवाटपामध्ये राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांची कामगिरी खालावली गेली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली ठरवण्यात आलेल्या आरखड्यानुसार राष्ट्रीयीकृत बँकांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 711 कोटी 60 लाख रूपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी फक्‍त 104 कोटी 36 लाख रूपयांचे कर्जवाटप केले आहे. त्यामुळे उद्दिष्टापैकी फक्‍त 15 टक्के कर्जवाटप झाले आहे. यामध्ये बड्या बड्या बँकांनीही हात काढता घेतल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेती करण्यासाठी शेतकर्‍यांना दारोदारी भटकावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

एकीकडे राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी पीक कर्ज देण्यात हात आखडता घेतल्याने जिल्हा बँकेने वडीलधार्‍याची भूमिका पार पाडली आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी जिल्हा बँकेने आपल्या उद्दिष्टापेक्षा जास्त पीक कर्जाचे वाटप केले आहे. जिल्हा बँकेला हंगामासाठी 1 हजार कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत बँकेने 1 हजार 48 कोटी 26 लाख  रूपयांचे पिक कर्जाचे वाटप केले आहे. हे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्यात येत आहे. जून व जुलैला जरी पाऊस झाला नसला तरी ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये जोरदार सरी कोसळतील अशी अपेक्षा शेतकर्‍यांना आहेत. त्यामुळे पेरण्यांची लगबग सुरू आहे. 

खरीपासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत कर्ज देण्याची मुभा आहे. असे असतानाही कर्जासाठी शेतकर्‍यांना दारोदार भटकावे लागत आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बँका शेतकर्‍यांना कर्जासाठी उभे करत नसल्याने या बँकांकडून जबरदस्तीने कर्ज वाटप करण्यासाठी पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आपला व्यवसाय वाढवायचा, डिपॉझिट घ्यायच्या व मोठ्या उद्योगपतींना कर्जे द्यायची फक्‍तच एवढेच काम या बँका करत आहेत. त्यांना शेतकर्‍यांशी काहीही घेणेदेणे नाही. त्यामुळेच फक्‍त 15 टक्के कर्जवाटप केले आहे. जिल्हा बँकेने आपली जबाबदारी चोख पार पाडल्याने अतिरिक्‍त उद्दिष्ट देऊन बँकेचे कंबरडे मोडण्याचे काम केले जात आहे. 

जिल्हाधिकार्‍यांनीच कारवाई करण्याची गरज

दरवर्षी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बँकांना किती पीक वाटपाचे उद्दिष्ट द्यायचे याची चर्चा होते. या बैठकीस लीड बँकेचे मॅनेजर, बँकांचे सीईओ, रिझर्व्ह बँकेचे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित असतात. नुकत्याच झालेल्या बैठकीत यंदा राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत. हंगाम निम्म्यावर आला असतानाही राष्ट्रीकृत बँकांचे समाधानकारक कर्ज वाटप झालेले नाही. त्यामुळे हे कर्ज वाटप होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. सातारा जिल्हा बँकेला यंदाही खरीप हंगामाला 1 हजार कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. बँकेने उद्दिष्टापेक्षा अधिक रक्‍कम वाटप केली आहे. रब्बी हंगामासाठी देण्यात आलेले 400 कोटींचे कर्जही वाटप केले जाईल. 

मुख्य कार्यकारी अधिकारी - राजेंद्र सरकाळे 

कमी कर्ज देणार्‍या राष्ट्रीयीकृत बँका

बँकेचे नाव        उद्दिष्ट         वाटप
अलाहबाद         2 कोटी        2 लाख
बँक ऑफ बडौदा    42 कोटी        7 कोटी 27 लाख
कॅनरा         22 कोटी         2 कोटी 40 लाख
कार्पोरेशन         15 कोटी        काहीच नाही
आयडीबीआय     95 कोटी        8 कोटी 91 लाख
इंडियन         2 कोटी 50 लाख      काहीच नाही
सिंडीकेट         20 कोटी        2 कोटी 51 लाख
युको         5 कोटी        64 लाख
युनायटेड         60 लाख        काहीच नाही
एचडीएफसी     35 कोटी        10 कोटी 20 लाख
आयसीआयसीआय      113 कोटी         10 कोटी 68 लाख