Thu, Jan 21, 2021 00:32होमपेज › Satara › साताऱ्यात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

साताऱ्यात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

Published On: Sep 25 2019 7:46PM | Last Updated: Sep 25 2019 7:46PM
सातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याने सातारा जिल्ह्यात त्याचे संतप्त पडसाद उमटले. साताऱ्यात भाजप सरकारचा जाहीर निषेध करत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पोवईनाका येथे निदर्शने करण्यात आली. तर कोरेगाव तालुक्यात रहिमतपूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

राज्य बँक घोटाळाप्रकरणी शरद पवार यांच्यासह सुमारे ७० जणांवर ईडीने मंगळवारी गुन्हा दाखल करताच सातारा जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पोवईनाका येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून पोवईनाका परिसर दणाणून सोडला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळी कपडे परिधान करून व काळे झेंडे दाखवून शासनाचा निषेध केला. 'सरकार पवार साहबसे डरती है, ईडी आगे करती है ’, ‘नरेंद्र मोदी सरकारचा धिक्कार असो', अशा गगनभेदी घोषणांनी पोवईनाका परिसर दणाणून सोडला.

आंदोलनात युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, अतुल शिंदे, शफीक शेख, राजेंद्र लवंगारे, महिला आघाडीच्या अध्यक्षा समिंद्रा जाधव, कार्याध्यक्षा जयश्री पाटील, स्मिता देशमुख, सनी शिर्के, तुषार गुरव, सागर चव्हाण, महेश मुंडे, महेश पवार, सचिन जाधव यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.