Fri, Jul 03, 2020 15:14होमपेज › Satara › राष्ट्रवादी काँग्रेसला चिंता नव्हे तर चिंतनाची गरज

पाटणकर गटाच्या मताधिक्याची परंपरा अबाधित

Published On: Jun 01 2019 2:03AM | Last Updated: Jun 01 2019 2:03AM
पाटण : गणेशचंद्र पिसाळ 

राष्ट्रवादी तथा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व युवा नेते सत्यजीतसिंह पाटणकर यांच्या विचारांचा बालेकिल्ला असणार्‍या  म्हावशी जिल्हा परिषद मतदारसंघात यावेळीही पाटणकर गटाचाच वरचष्मा राहिला. येथून राष्ट्रवादीचे खा. उदयनराजे भोसले यांना 2709 इतके मताधिक्य देत सत्यजीतसिंह पाटणकर यांचा गनिमी कावा यात यशस्वी झाला.

नरेंद्र पाटील स्थानिक तर राजेंविषयी नाराजी याचा काही प्रमाणात फटका बसला अन्यथा येथून याहीपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले असते. मात्र आव्हानात्मक परिस्थितीतही पाटणकर गटाची निकराची झुंज येथे राष्ट्रवादीसाठी सकारात्मक ठरली हे निश्‍चित. 

पूर्वीचा पाटण जिल्हा परिषद गट हा पाटण शहराच्या नगरपंचायत निर्मितीनंतर म्हावशी असा झाला. यात म्हावशी व चाफळ अशा दोन पंचायत समिती  गणांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून म्हावशी पंचायत समिती गणातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना 5801 तर नरेंद्र पाटील यांना 3356 मते मिळाली.  राजेंना 2445 इतके मताधिक्य मिळाले. 

चाफळ पंचायत समिती गणातून भोसले यांना 4897 तर नरेंद्र पाटील यांना 4633 मते मिळाली.  राजेंना 264 चे मताधिक्य मिळाले. या जिल्हा परिषद गटात खा. उदयनराजे भोसले यांना एकूण 10968 व नरेंद्र पाटील यांना 7989 इतकी मते मिळाली. येथून राजेंना एकूण 2709 इतके मताधिक्य मिळाले. वंचित आघाडीच्या आनंदा थोरवडे यांना अवघी 110 मते मिळाली. 

या मतदारसंघात प्रामुख्याने विक्रमसिंह पाटणकर, सत्यजीतसिंह पाटणकर यांच्यासह जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार, पंचायत समिती सदस्य, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे, राष्ट्रवादीचे  तालुका  सरचिटणीस सुभाषराव पवार, तालुका दूध संघाचे चेअरमन शंकरराव जाधव आदी मान्यवरांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अशा आव्हानात्मक परिस्थितीत येथे मताधिक्य टिकवणे ही बाब महत्वाची होतीच. त्याचवेळी विरोधी आ. शंभूराज देसाई यांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही तोडीस तोड नियोजन करून आव्हान निर्माण केले होते. नुकत्याच झालेल्या चाफळ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला अनपेक्षित फटका बसल्याने त्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊनच खबरदारी घेण्यात आली होती. यात मताधिक्य टिकविण्याचे आव्हान होते.

पाटणकर गटाचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. त्याचवेळी घटलेले मताधिक्य याला भलेही राजकीय काहीही कारणे असोत याबाबत चिंता करण्यापेक्षा चिंतन करून पुन्हा नव्या उमेदीने विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागावे लागणार आहे. त्याचवेळी चाफळ ग्रामपंचायत निवडणुकीत वाढलेले आ. देसाई गटाचे मनोबल या लोकसभेत पाटणकर गटाचे मताधिक्य घडविण्यात कामी आले. आता त्याच मनोधैर्यावर आगामी राजकीय रणनिती आखूनच त्यांनाही कामाला लागणे राजकीय हिताचे ठरणार आहे. या मतदारसंघात यावेळी दस्तुरखुद्द उदयनराजे भोसले यांनी कमालीचे लक्ष व जनसंपर्क वाढवला होता. नरेंद्र पाटील स्थानिक नेत्यांवर अवलंबून राहिले. याचेही परिणाम येथील मतदानातून पहायला  मिळाले.