Sat, Jul 11, 2020 21:15होमपेज › Satara › मोदींची राजीव गांधींवरील टीका अयोग्य : शरद पवार

मोदींची राजीव गांधींवरील टीका अयोग्य : शरद पवार

Published On: May 10 2019 2:05AM | Last Updated: May 10 2019 2:05AM
सातारा : प्रतिनिधी

राजीव गांधी यांचा मृत्यू क्लेशदायक होता. गांधी कुटुंबातील दोन व्यक्‍ती देशाच्या पंतप्रधान झाल्या आणि त्यांची हत्या झाली. त्या कुटुंबाने मोठा त्याग केला. त्यानंतर त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची भाषा अयोग्य आहे. पंतप्रधानांना अशी भाषा शोभणारी नाही. देशात परिवर्तनाचे वातावरण निर्माण झाले असून लोकसभा निवडणुकीत यूपीए सरकारच्या जागा वाढतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने  आयोजित कर्मवीर पुण्यतिथी सोहळ्यानंतर पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. 

राजीव गांधी भ्रष्ट पंतप्रधान होते, या मोदींनी केलेल्या टीकेबाबत  विचारले असता खा. शरद पवार म्हणाले, पदावर असताना  पंतप्रधानांनी भाषण करताना काळजी घ्यायला हवी. मात्र, त्यांच्याकडून रोज अशाप्रकारची भाषणे ऐकायला मिळणे चांगलं लक्षण नाही.  पंधप्रधानपदासाठी महाराष्ट्राला संधी मिळू शकते का? असे विचारले असता खा. शरद पवार म्हणाले, पंतप्रधानपदी संधी कुणाला मिळेल किंवा कुठल्या राज्याला मिळेल हा विषय माझ्यादृष्टीने गौण आहे. पहिल्यांदा आम्हाला देशात परिवर्तन हवे आहे. त्यासाठी पूरक स्थिती आहे की नाही हा प्रश्‍न आहे. देशात अनुकूल-प्रतिकूल स्थिती किती आहे हे लक्षात घेवून परिवर्तनाला समर्थन देणार्‍या सर्व घटकांना एकत्र येवून बसावे लागेल. त्यांच्यात एकवाक्यता ठेवावी लागेल.  जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत पंतप्रधानपदी कुणाला संधी याची चर्चाही करणार नाही. विरोधी सर्व पक्षांमध्ये एकवाक्यता निर्माण करुन लोकांना पाच वर्ष स्थिर सरकार द्यायचं आहे. स्वत:चा विचार न करता बहुमत  कसं मिळेल याचा मी विचार करतोय, असेही पवारांनी स्पष्ट केले.

चौकीदारप्रकरणी राहूल गांधींनी माफी मागितली. लोकसभा निवडणुकीत राज्यात काय चित्र असेल? सातारा लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचे काय होणार? असे विचारले असता खा. शरद पवार म्हणाले,  चौकीदार या शब्दावर कुणी आक्षेप घ्यायचं कारणच  नव्हतं. पण त्यांच्या निवेदनात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं आहे असे माझ्या वाचनात आले. त्याबद्दल त्यांनी माफी मागावी असं आहे. त्यात सुप्रीम कोर्टाचा कुठं संबंधच नाही. 2014 साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 4 आणि राष्ट्रीय काँग्रेसला 2 अशा एकूण 6 जागा मिळाल्या होत्या.  यावर्षी झालेल्या निवडणुकीत यामध्ये सुधारणा होईल, असं वाटतं. महाराष्ट्रातील जागावाढीचा आकडा मोठा असेल. काही ठिकाणी महाआघाडीच्या उमेदवारांना चांगले मतदान झालेले दिसेल. काही ठिकाणी यश मिळेल पण  मते कमी झालेली दिसतील. एकंदर विचार केला तर महाराष्ट्रासह देशातील कौल आमच्यासाठी चांगला असेल, असेही पवारांनी सांगितले. मतदानावेळी सातार्‍यातील तुम्ही लोकांनी  काय केलंय माहित नाही. महाआघाडीच्या उमेदवाराबाबत शंका नाही पण किती मतांनी निवडून येतील हे माहित नाही, असा अंदाजही पवारांनी व्यक्‍त केला.

राजीव गांधींनी युध्दनौकांचा वापर सुट्ट्यांसाठी केल्याची टीका मोदींनी केली, याबाबत विचारले असता खा. शरद पवार म्हणाले, मी संरक्षण मंत्री असताना युध्दनौकांतून पाहणी करायचो. युध्दनौका सातत्याने समुद्रातील सीमांवर फिरत असतात.  अशावेळी त्या युध्दनौकांतून पंतप्रधान किंवा संरक्षण मंत्री गेला तर त्यात गैर काय वाटत नाही.  युध्दनौकेतून कामकाज पाहता येते, माहिती घेता येते, त्याठिकाणी सैनिक असतात, त्यांची परेड असते.   युध्दनौकेतून मंत्री मजा म्हणून जात नाहीत, असेही पवारांनी स्पष्ट केले.

नारायण राणेंनी लिहिलेल्या आत्मचरित्रात ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देवून बाळासाहेब ठाकरे यांची हत्या करण्याचा कट होता. तुम्ही मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांना बोलावून याची कल्पना दिलीत, याबाबत विचारले असता खा. शरद पवार म्हणाले, हे पुस्तक मी वाचलेले नाही.  हा खूप गंभीर विषय आहे. पुस्तक वाचल्यानंतर मी यावर बोलेन असे त्यांनी सांगितले. निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरल्याबाबत विचारले असते ते म्हणाले, दुर्योधन, अर्जुन इतके वाईट नव्हते इतके हे वाईट आहेत.  हे मृत्यू झालेल्या माणसाला भ्रष्टाचारी म्हणतात. आपण कुठल्या पदावर असून काय बोलतोय याचं भान त्यांना राहिलेलं नाही, असेही पवारांनी सुनावले.

घड्याळाचं मत कमळाला कसं? 

ईव्हीएम मशिनवर पवार जे बोलले त्याची मला चिंता वाटते, मोदींच्या या विधानाबाबत विचाले असता खा. शरद पवार म्हणाले, मलाही चिंताच वाटते. माझ्यासमोर हैदराबाद तसेच गुजरातच्या लोकांनी ईव्हीएम मशिन ठेवून बटण दाबायला सांगितले. मी घड्याळाचं बटण दाबलं तर मत कमळाला गेलं हा मला आलेला अनुभव आहे. सर्व मशिनमध्ये असे असेल असं मी म्हणत नाही. पण, ही परिस्थिती असल्यामुळे मी चिंता व्यक्‍त केली. त्यासाठी आम्ही कोर्टात गेलो. व्हीव्हीपॅटची पन्‍नास मतं मोजण्याचं आमचं म्हणणं कोर्टाने अमान्य केलं. यापूर्वी मतपत्रिकेवरील मत मोजत होतोच की. त्यावेळी अशी मते मोजता येत होती मग आता का नाही? असा सवालही पवारांनी केला.