पाटण : गणेशचंद्र पिसाळ
पाटण शहर व परिसरात सध्या मोबाईल फोन असो किंवा लँडलाईन फोन यांच्या सेवांची पूरती वाट लागली आहे. ’ देश की सबसे बडी सेवा ’ हे ब्रीदवाक्य घेऊन जन्माला आलेल्या बी. एस. एन. एल. सेवेचे येथे ‘सबसे खराब सेवा’ असे रूपांतर झाले आहे. तर ‘व्हॉट अॅन आयडीया सरजी’ म्हणणार्या यांच्याच आयडीयांना आता ग्राहक पुरते वैतागले आहेत. फोनची बोंब तर मग नेट सेवेची बोंबाबोंब येथे आता नित्याचीच बनली आहे. त्यामुळे हे नेटवर्क कधी ‘निट वर्क ’ करणार ? हाच खरा प्रश्न आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आयडिया मोबाईल कंपनीने ग्राहक सुविधा तर दूरच मात्र किमान सेवाही देण्याचे काम व्यवस्थित केले नाही. तोंडी, लेखीच न्हवे तर अगदी ऑनलाइन तक्रारीमध्ये यांचे नक्कीच येथे नवनवीन विक्रम प्रस्थापित झाले असतील. या कंपनीचे टॉवर त्यावरची ग्राहक क्षमता याचा कोणताही मेळ नसल्याने मग आहे त्या साधनसामुग्रीवर भरमसाठ ग्राहक व त्याचपटीत नव्या योजना लादण्याचे काम येथे चालू आहे. वास्तविक अन्न, वस्त्र, निवारा इतकीच सध्या मोबाईल फोनची गरज वाढली आहे. तर शरीराला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागते तितकीच गरज सध्या मोबाईलच्या रेंज व नेटसाठीही महत्वाची बनली आहे.
परंतु एका बाजूला प्री पेड , पोस्ट पेडच्या भरमसाठ बिलांनी ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. आणि हे भरमसाठ बिल भरूनही पदरी नेटवर्कची घोर निराशा तर कायम पाचवीलाच पुजलेली आहे. अनेकदा या कंपन्यांच्या मोबाईल फोनला रेंजच नसते तर कित्येकदा ती केवळ हँडसेटवर दिसते मात्र प्रत्यक्षात नसतेच. सातत्याने कॉल ड्रॉप चे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढतच चालले आहे. तर एकतर्फी संभाषण अशा बाबीना ग्राहक पूरते वैतागले आहेत. याशिवाय नेटची सेवा बहुतेकदा ‘निट’ नसतेच. स्थानिक पातळीवर यांचे महत्वपूर्ण कार्यालय तर नाहीच त्यामुळे ग्राहकांनी कितीही तक्रारी केल्या तरी त्याचा कोणताही परिणाम येथे होत नाही.
एका बाजूला मोबाईल कंपन्यांची ही बोंबाबोंब सुरू असताना अलीकडच्या काळात बी. एस. एन. एल. सेवेलाही फेफरे भरले आहे. सातत्याने साधे लँडलाईन असो किंवा मोबाईल फोन त्यांचे नेटवर्क हे बंद पाडण्याचा सपाटाच यांनी लावल्याने ग्राहक वैतागले आहेत. त्यामुळे आता याची गंभीर दखल घेऊन खाजगीसह शासकीय या व्यवस्थेची कायमची बोंबाबोंब थांबवावी अन्यथा होणार्या दुष्परिणामांना सामोरे जावे असा इशाराही त्रस्त ग्राहकांमधून दिला जात आहे.
मोबाईल फोन कंपन्यांच्या चौकशीची मागणी
पाटण परिसरात अनेक मान्यवर मोबाईल फोन कंपन्या आहेत. कंपन्यांची संख्या व त्यासाठीची टॉवर संख्या यासह त्या टॉवरवरची ग्राहक संख्या मर्यादा याचा कोठेही मेळ बसत नाही. परिणामी ग्राहक सेवांची तर बोंब सुरूच असते. याशिवाय नगरपंचायत सह अन्य शासकीय कर चुकविण्यासाठी कंपन्यांच्या अशा ‘आयडिया’ ची चौकशी करून त्यांचेवर कडक कारवाया कराव्यात अशाही मागण्या ग्राहकांमधून होत आहेत.