होमपेज › Satara › मोर्चामुळे पाटणमधील मराठा युवक चार्ज 

मोर्चामुळे पाटणमधील मराठा युवक चार्ज 

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 10:40PMसणबूर ः तुषार देशमुख

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे यासह अन्य मागण्यांसाठी पाटण तालुक्यातील हजारो मराठा बांधवांनी आ. शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली नवारस्ता ते पाटण विराट मोर्चा काढल्याने तालुक्यातील मराठा युवक चार्ज झाले आहेत.

आरक्षणावरून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. गुरूवारी पाटण तालुक्यात शंभर टक्के बंद पाळून मराठा युवक हजारोंच्या संख्येने सकाळी नऊ वाजता नवारस्ता येथे जमा झाले होते. या विराट मोर्चाचे नेतृत्व आ. शंभूराज देसाई यांनी केले.

दरम्यान मराठा समाजाने क्रांतीदिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यामुळे हा बंद शांततेत पार पाडावा, असे अवाहन आ. देसाई यांनी आंदोलकांना केले होते. मोर्चावेळी आ. देसाई यांनी स्वत: रस्त्यावर उतरून मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विधानसभेत माझी भूमिका नेहमीच आग्रही राहिली. या मागणीवरून अनेकदा सभागृह बंद पाडले. प्रसंगी सत्तेतील आमदार असून देखील शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांना मराठा आमदारांसोबत बैठक घेण्यास भाग पाडले. आंदोलनादरम्यान शहीद झालेला चाफळचा युवक रोहन तोड़कर याला मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब मदत द्यावी यासाठी पाठपुरावा केला.गुरूवारी सातारा जिल्ह्यातील एकमेव आमदार रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी झाल्याने येथील मराठा युवक चांगलेच चार्ज झाले होते. 

हजारोंच्या संख्येने नव्या रस्त्यावरून निघालेला मोर्चा कराड चिपळून मार्गावरून शांततेत मार्गक्रमण करत पाटण शहरातून तहसील कार्यालयावर येवून धडकला. मोर्चाचे रूपांतर ठिय्या आंदोलनात झाले. तहसील कार्यालयाबाहेर आंदोलनस्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून आ. देसाई यांच्यासह हजारो युवकांनी ठिय्या आंदोलन केले. दुपारी चार वाजता उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिस्तबध्द मोर्चा..

आ. शंभूराज देसाई यांच्या अवाहनामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता मोर्चा शांततेत निघाला.तसेच जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा , छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषनांनी परिसर दणाणून गेला.  अतिशय शिस्तबद्ध निघालेल्या या मोर्चाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.