Mon, Jul 06, 2020 22:44होमपेज › Satara › मनोज घोरपडेंना पाठबळ देणार : मुख्यमंत्री

मनोज घोरपडेंना पाठबळ देणार : मुख्यमंत्री

Published On: Sep 18 2019 1:44AM | Last Updated: Sep 17 2019 10:40PM

file photoनागठाणे : वार्ताहर

सातारा व कराडच्या सभांमुळे  नागठाणे येथे महाजनादेश यात्रेला अधिक वेळ देता येत नाही. मात्र, नागठाणेत मी जाणीवपूर्वक वेळ दिला आहे.  मनोज घोरपडे यांची राजकीय ताकद  तोबा गर्दीमुळे दिसून आली. भाजप त्यांना  संपूर्ण पाठबळ देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, कराड उत्तर मतदार संघाचे प्रवेशद्वार असलेल्या नागठाणे येथे झालेल्या उत्स्फूर्त स्वागताने  मुख्यमंत्री भारावून गेले. त्यांनी स्वत:च्या गळ्यातील हार मनोज घोरपडे यांच्या गळ्यात टाकल्याने घोरपडेंच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

महाजनादेश यात्रेचे नागठाणे, ता. सातारा येथे कराड उत्तरचे भाजपा नेते मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांसोबत महाजनादेश यात्रेचे प्रमुख सुरजितसिंह ठाकूर, भाजपा प्रदेश अध्यक्ष ना. चंद्रकांत पाटील, ना.गिरीश महाजन, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर यांचीही उपस्थिती होती. 
कराड उत्तर विधानसभा मतदार संघाच्या प्रवेशद्वारावर मनोजदादांनी  मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनोजदादांना जवळ घेऊन मिठी मारत  स्वतःच्या गळ्यातील घातलेला हार मनोजदादांच्या गळ्यात घालताच कार्यकर्त्यांनी जल्‍लोष केला. 

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला तुमच्या प्रेमाची व आशीर्वादाची गरज आहे. खरेतर जास्त वेळ द्यायचा होता परंतु सातारा येथील सभेला झालेला उशीर व कराडला असलेली सभा यामुळे जास्त वेळ देता येत नाही. परंतु दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत थांबलेल्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे यांचे काम स्तुत्य असून भाजपाची ताकद आणखी वाढवा, विकासकामांमध्ये कुठेही हयगय होणार नाही. मनोज घोरपडे यांच्या पाठीशी भाजपची भक्‍कम ताकद उभी असल्याचेही त्यांनी सांगितले. 

महाजनादेश यात्रा नियोजित वेळेनुसार दुपारी 4 वाजता नागठाणे येथे येणार होती परंतु यात्रेला उशीर झाला तरीही कार्यकर्ते रात्री 9 पर्यंत थांबले होते. त्यांचा उत्साह कमी झाला नव्हता. ‘एकच दादा, मनोजदादा’ व मुख्यमंत्री यांच्या जयघोषाच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.

यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत पाटील, सुरेश पाटील, जितेंद्रदादा पवार, जि. प.सदस्या भाग्यश्री मोहिते, पं.स.सदस्य विजया गुरव, संजय घोरपडे, विकास गायकवाड, धनाजी जाधव, अमोल पवार आदी उपस्थित होते.