Sat, Jul 11, 2020 19:23होमपेज › Satara › विकास झाला, तरीही अजून भरपूर वाव...!

विकास झाला, तरीही अजून भरपूर वाव...!

Published On: May 28 2018 1:33AM | Last Updated: May 27 2018 11:14PMकराड : अमोल चव्हाण

मलकापूर नगरपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले असून त्यासाठी सत्ताधारी काँग्रेससह भाजप तसेच इतर राजकीय पक्ष व संघटनांनी कंबर कसली आहे. काँग्रेसकडून गत नऊ वषार्ंत केलेल्या विकास कामांबरोबर राबविलेल्या नवनवीन योजना व उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुुरू आहे. भाजपाकडून काँग्रेसचे (विशेषत: मनोहर शिंदे यांचे) राजकीय विरोधक एकत्र करून त्यांची मोट बांधत काँग्रेसच्या कालावधीत न झालेल्या कामांचा पाढा वाचण्याबरोबरच नगरपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यास सुरवात केली आहे. मलकापूरला नगरपालिकेचा दर्जा देण्याबाबत दोन्ही पक्षांकडून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे व उंडाळकर गटाकडून ‘आगे आगे देखो होता है क्या’ अशी भुमिका घेतली जात आहे. एकूण मलकापूरमध्ये सध्या राजकीय वातावरण तापू लागले असून शहरात कोणकोणती कामे झाली? सध्या सुुरू असलेल्या कामांची परिस्थिती काय आहे? कोणती कामे पूर्ण झाली आहेत तर कोणती अपूर्ण आहेत? कोणत्या वॉर्डमध्ये अजून कोणती कामे करणे गरजेचे आहे? झालेल्या विकास कामांबाबत नागरिक समाधानी आहेत का? विरोधकांकडून कोणते मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात? तसेच नगराध्यक्ष पदासह प्रत्येक वॉर्डमधील संभाव्य उमेदवार कोण असतील यासह एकूणच मलकापूरबाबतचा लेखाजोखा वॉर्ड निहाय आजपासून...

मलकापूर नाविण्यपूर्ण योजनांची कार्यशाळा आहे, असे म्हटले जाते. शासनाच्यावतीने कोणतीही नवीन योजना आखली गेली किंवा एखादा उपक्रम हाती घेतला तर तो प्रथम मलकापूरमध्ये राबविला जातो.  मलकापूरने ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्यापासून गेल्या नऊ वर्षात अनेक उपक्रम राबविले. ज्या योजना किंवा उपक्रम हाती घेतले त्यामध्ये खंड पडू न देता ते कायम सुरु ठेवले. त्यातून मग 24 बाय 7 नळपाणी पुरवठा योजना असो किंवा सोलरसिटी योजना या योजनांची महाराष्ट्रानेच नव्हे तर देश पातळीवर दखल घेतली गेली. कन्यारत्न योजना, मुलींना मोफत पास देण्याचा उपक्रम, सांडपाणी प्रक्रिया योजना, भुयारी गटर योजना यासह नागरिकांना करामध्ये 20 टक्क्यांपर्यंत सवलत देण्याची योजना असो यामध्ये नगरपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी नेहमीच नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले आहेत. 

संपूर्ण शहरात दारुबंदी करण्याच्या निर्णयासह शहर स्वच्छता अभियानात केलेल्या उल्लेखनिय कामाची दखल स्वच्छता समितीला घ्यावी लागली होती. तसेच नगरपंचायतीने आंध्रप्रदेश राजमंट्री येथून आणलेल्या 5 हजार वृक्षांचे रोपन करून आज ही रोप रस्त्याच्याकडेला तसेच इतरही ठिकाणी मलकापूरकरांना गारवा देत आहेत. यामुळेच तर मलकापूरला ग्रीनसिटी म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. याबाबत मनोहर शिंदे यांनी नुकतेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून वृक्षारोपणाबाबत मलकापूरने केलेल्या कामाचा अहवाल सादर केला. सध्या मलकापूरमध्ये भुयारी गटर योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून रस्त्यांची कामे गतीने सुरु असल्याचे सत्ताधार्‍यांकडून सांगितले जात आहे. 

असे असले तरी मलकापूरमधील नागरिक उकरलेल्या रस्त्यांमुळे वैतागले आहेत. भुयारी गटर योजनेच्या कामासाठी रस्ते उकरले असून सध्या बहुतांशी रस्त्यांची कामे नगरपंचायतीने हाती घेतली आहेत. मलकापूरमधील रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला असून पावसाळ्यापूर्वी (निवडणुकीपुर्वी) रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांकडून सुरु आहे. परंतु, सध्या सुरु असलेली रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असून काही ठिकाणी लोकांनी कामे बंद पाडली आहेत. निवडणुकीपूर्वी रस्त्याची कामे करण्यासाठी धडपड सुरु असल्याने अनेकठिकाणी भुयारी गटर योजनेला घरातून बाहेर येणार्‍या सांडपाण्याचे कनेक्शन न जोडताच रस्त्याचे काम केले जात असल्याने पुन्हा रस्ता उकरण्याची वेळ येणार असल्याचा आरोप होत आहे. त्यातच गेली अनेक दिवसांपासून वृक्षारोपन, भुयारी गटर योजनेसाठी शहरातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. सध्या काही ठिकाणी कामे सुरु आहेत मात्र, त्यामध्येही ठेकेदाराकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे फक्त तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा रस्त्याचे दर्जेदार काम होण्यासाठी त्या-त्या वॉर्डमधील लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी लक्ष देण्याची गरज आहे. परंतु, लोकप्रतिनिधी व इच्छुक उमेदवारांच्या डोक्यात निवडणुकीचा विचार सुरु असल्याने त्यासाठी जुळवाजुळव करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे त्यांचे रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष असल्याने कामाचा दर्जा राखला जात नसल्याचा आरोप होत आहे.   

मलकापूरमधील भाजीमंडईचा प्रश्‍न आजही अधांतरीच असून शेतकर्‍यांना कायमस्वरूपी जागा मिळत नसल्याने त्यांना रस्त्यावर किंवा खासगी जागेत बसून भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे. मंडईच्या प्रश्‍नावरून तर शेतकरी संघटनामध्ये चांगलाच वाद निर्माण झाला होता. तर व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांच्या बसण्याच्या जागा बळकावून उलट शेतकर्‍यांवरच दादागिरी करण्यास सुरुवात केली होती.  त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्या उद्देशाने उपोषण केले तो उद्देश सफल झाला का? हा खरा प्रश्‍न आहे. 

मलकापूर विकास आराखड्याबाबत लोकांच्या मनामध्ये असलेला संभ्रम अजूनही कायम आहे. अनेकांच्या जमिनीवर पडलेले आरक्षणाचे पुढे काय झाले? हे अद्यापही काहींना समजलेले नाही. काही लोकांच्या जमिनीवरील आरक्षण उठल्याचे सांगितले जात आहे. मलकापूरच्या विकासासाठी आलेल्या निधीचा योग्य कारणासाठी विनियोग झाला असेल तर विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत सत्ताधार्‍यांची भूमिका काय? की हा नेहमीप्रमाणे नुसताच राजकीय आरोप करून नेत्यांना खूश करण्यासाठी केलेली भाषणबाजी आहे, हेही नागरिकांसमोर आले पाहिजे. खरच भ्रष्टाचार झाला असेल तर महसूल मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे नगरपंचायतीची चौकशी लागणार का? त्यांना आवश्यक ती कागदपत्रे दिली जाणार का? की राजकीय द्वेषापोटी नुसतेच आरोप होत राहणार हे येणारा काळ स्पष्ट करेल. सध्या मलकापूर वासीय ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’  च्या मानसिकतेत आहेत.   

नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार...
मलकापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसीसाठी (इतर मागास वर्ग) आरक्षित पडले आहे. त्यानुसार सत्ताधारी काँग्रेससह भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना व इतर राजकीय पक्ष, संघटना व अपक्षांनी नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काहींनी प्रचार सुरु केल्याचे दिसून येत आहे. नगराध्यक्षपदासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव सुतार, माजी नगराध्यक्ष मोहनराव शिंगाडे, संजय येडगे, माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, आण्णासोा काशिद, सुभाष माने, काना  लाखे, शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष सूर्यकांत मानकर, भारत जंत्रे, राहुल भोसले यांच्या नावाची शहरात जोरदार चर्चा आहे.