Thu, Jul 02, 2020 12:17होमपेज › Satara › माणच्या प्रशासनात अवतरले महिलाराज

माणच्या प्रशासनात अवतरले महिलाराज

Published On: Sep 16 2019 1:38AM | Last Updated: Sep 15 2019 9:11PM
शिखर शिंगणापूर : वार्ताहर

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या प्रशासनाची दोरी सध्या कर्तृत्ववान महिलांच्या हाती आहे. तालुक्यातील अधिकारी व पदाधिकारी पदांवर महिलांचे वर्चस्व असून माणच्या प्रशासनात सध्या ‘महिलाराज’ पहायला मिळत आहे.

सातारा जिल्ह्याला पूर्वीपासूनच कर्तृत्ववान महिला अधिकार्‍यांचा इतिहास आहे. यापूर्वीच्या जिल्हाधिकारी वंदना खुल्लर, पोलिस अधीक्षक मीरा बोरवणकर यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा जिल्ह्यात उमटवला आहे. सध्याही जिल्हा प्रशासनाची सूत्रे महिला अधिकार्‍यांच्याच हातात आहेत. सातारा जिल्हाधिकारी पदावर श्वेता सिंघल व पोलिस अधिक्षक पदावर तेजस्वी सातपुते कार्यरत असून प्रशासकिय कामाबरोबरच विविध शासकीय योजनांतून जनसेवेचा वसा पुढे नेण्याचे काम या कर्तृत्ववान महिला अधिकारी करत आहेत.

यापूर्वी माणच्या तहसीलदार म्हणून सुरेखा माने तर गटविकास अधिकारी म्हणून रुपाली सातपुते, सीमा जगताप यांनी प्रशासकीय जबाबदारी पार पाडली आहे. सध्या माणच्या प्रशासनाची सूत्रे महिलांच्या हातात आहेत. नुकतीच माण-खटावच्या प्रांताधिकारीपदी अश्विनी जिरंगे यांची नियुक्ती झाली आहे. माणच्या तहसीलदार म्हणून एक वर्षापासून बाई माने काम पाहत आहेत.

माणच्या शिक्षण विभागाचे कामकाज गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते व विस्तार अधिकारी संगीता गायकवाड पहात असून दहिवडी आगार व्यवस्थापक पदावर मोनाली खाडे कार्यरत आहेत तर तालुक्याच्या दुय्यम निबंधक पदाचा कारभार विजया बाबर यांच्याकडे आहे. सध्या माणमधील महिला अधिकारी जबाबदार पदांवर सक्षमपणे प्रशासकीय कामकाज करताना दिसत आहेत.