Sat, Jul 11, 2020 20:02होमपेज › Satara › महाजनादेश यात्रा आज सातारा जिल्ह्यात 

महाजनादेश यात्रा आज सातारा जिल्ह्यात 

Published On: Sep 15 2019 12:59AM | Last Updated: Sep 14 2019 10:24PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससातारा : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात भाजपच्या महाजनादेश यात्रेचे रविवारी दुपारी आगमन होत आहे. मुख्यमंत्र्याच्या मुख्य उपस्थितीत ही यात्रा जिल्ह्यात येणार असून यात्रेचे ठिकठिकाणी जंगी स्वागत होणार आहे. महाजनादेश यात्रेमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. सैनिक स्कूल मैदानावर मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असून या यात्रेच्या स्वागतासाठी भाजपाने जिल्ह्यात जय्यत तयारी केली आहे. 

रविवारी सकाळी महाजनादेश यात्रा पुण्याहून नसरापूर, कापूर होळ मार्गे, भोर मार्गे येणार आहे. सातारा जिल्ह्यातील शिंदेवाडी फाटा येथे यात्रेचे आगमन होणार असल्याची माहिती महाजनादेश यात्रा मार्ग प्रमुख अ‍ॅड. भरत पाटील यांनी दिली. महाजनादेश यात्रेमधील रथामध्ये  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याबरोबर महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन,  शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर सहभागी होणार आहेत.

यात्रेचे शिरवळ येथे दुपारी 1 वाजता आगमन होणार आहे. शिंदेवाडी फाट्यावरून खंडाळा, वेळे, सुरूर फाटा येथून वाई शहरात 2 वाजता आगमन होणार आहे. वाईतील छत्रपती शिवाजी चौकात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा झाल्यानंतर महाजनादेश यात्रा  पाचवड, उडतारे, आनेवाडी, लिंबफाटा,  मार्गे सातारा शहरात येणार आहे. 

महाजनादेश यात्रेबरोबर भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. मोळाचा ओढा येथे मोटारसायकल रॅलीस प्रारंभ होणार आहे. महाजनादेश यात्रा मोळाचा ओढा, करंजे नाका,  हुतात्मा स्मारक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, एसटी स्टॅन्ड, राधिका रोडमार्गे, राधिका चौक, मोती चौक, कमानी हौद, शेटे चौक, जिल्हा पोलिस मुख्यालय,  पोवईनाका, जिल्हा रूग्णालय, मुथा गॅरेज, कनिष्क हॉल, सैनिक स्कूल गेट या मार्गावरून जाणार आहे. 

महाजनादेश यात्रा मार्गावर ठिकठिकाणी गुढ्या व तोरणे, रांगोळ्या व स्वागत कमानी उभ्या करण्यात आल्या आहेत. महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी सातारा शहरासह जिल्ह्यात भाजपाच्या नेतेमंडळींनी  फ्लेक्सबाजी केली आहे. ठिकठिकाणी मोठ मोठे होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर  लावण्यात आले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच दुभाजकावर, पदपथ, इमारतीवर मुख्यमंत्र्याच्या स्वागताचे फलक, भाजपचे झेंडे झळकत आहेत. त्यामुळे सर्वत्र वातावरण भाजपमय झाले आहे.

सैनिक स्कूल येथे महाजनादेश यात्रेची जाहीर सभा 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर ही यात्रा शेंद्रे, नागठाणे, काशिळमार्गे उंब्रज येथे 4.30 वाजता जाणार आहे. यानंतर मसूर व कराड येथे मुख्यमंत्र्याच्या जाहीर सभा होणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे जलमंदिरवर स्नेहभोजन

सैनिक स्कूल मैदानावरील सभा झाल्यानंतर महाजनादेश यात्रा पुढील मार्गावर मार्गस्थ होण्यापूर्वी उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांतदादा पाटील, ना. गिरीष महाजन यांच्यासह भाजप पदाधिकार्‍यांचे स्नेहभोजन होणार आहे. 

रॅलीसाठी 3 हजार दुचाकी सज्ज 

भाजपची महाजनादेश यात्रेचा सातारा शहरातील प्रारंभ हा दुचाकी रॅलीने होणार आहे. या रॅलीसाठी 3 हजार दुचाकी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या संख्येने युवा वर्ग सामील होणार आहे. सभास्थळी सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेसाठी सैनिक स्कूल मैदानावर 40 फूट लांबीचे भव्य स्टेज, भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सभेला कोणतीही कमतरता राहू नये यासाठी जिल्ह्यातील मुख्य नेत्यांनी लक्ष घातले आहे.