Mon, Aug 03, 2020 15:03होमपेज › Satara › मदनदादा-मकरंदआबा २० वर्षांत पहिल्यांदाच बोलले

मदनदादा-मकरंदआबा २० वर्षांत पहिल्यांदाच बोलले

Published On: Dec 14 2018 1:53AM | Last Updated: Dec 13 2018 10:35PM
सातारा : हरीष पाटणे

‘कृष्णाकाठ’च्या वाईने बलाढ्य नेत्यांच्या हाणामार्‍या पाहिल्या, रक्‍तरंजित राजकीय संघर्षही पाहिला, तंटे  बखेटे, कोर्ट कचेर्‍या, टोकाची राजकीय साठमारी पाहिली, ज्यांच्या दोस्तान्याने राज्याचे तख्त विस्मयचकीत व्हायचे त्या प्रतापराव भोसले व लक्ष्मणराव पाटील यांच्यातील नंतरच्या काळातील दुश्मनीही पाहिली. त्याच कृष्णेच्या पाण्याला संवेदनशीलतेचा गहिवर असल्याचा अनुभव  बुधवारी प्रतिभा हॉस्पिटलमध्ये आला. आपला जुना दोस्त अत्यवस्थ असल्याच्या वार्तेने गहिवरलेल्या प्रतापरावभाऊ भोसले यांनी तडक हॉस्पिटल गाठले तर गेल्या 20 वर्षांत एकमेकांशी नजरानजर होवूनही कधीही न बोललेले मदनदादा भोसले व मकरंदआबा पाटील यांनीही प्रथमच अबोला सोडला. 

प्रतापराव भोसले व लक्ष्मणराव पाटील हे दोघेही किसनवीर आबांचे अनुयायी. प्रतापराव भोसले यांनी लक्ष्मणराव पाटील यांना बरोबर घेवून वाईचे राजकारण केले. प्रतापरावभाऊंचा जीवलग सहकारी ही लक्ष्मणतात्यांची राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीची ओळख राहिली. भाऊंनी दिल्‍ली पहायची, राज्य फिरायचे आणि तात्यांनी भाऊंच्या शब्दावर मतदार संघ पिंजून काढायचा. ‘तिथे लक्ष्मणराव आहेत त्यांच्याशी बोलून घ्या’, अशी भाऊंची भाषा असायची.  संपूर्ण राज्यात या दोघांची मैत्री विस्मयाने पाहिली जायची.  मात्र, दोघांचीही कारकीर्द ऐन बहरात असताना दोघेही एकमेकांपासून विलग झाले. ते एवढे बाजूला गेले की वाहत्या कृष्णेच्या पाण्यात उभ्या फाळण्या पडाव्यात, दोन्ही वाहते प्रवाह एकमेकांत मिसळण्याऐवजी खळखळाट करत दोन्ही दिशेने निघून जावेत, एवढी उभी दरी पडली. दोस्तीची जागा दुश्मनीने घेतली आणि स्थानिक स्वराज्य संस्था, वाई विधानसभा मतदार संघ, किसन वीर कारखाना, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक अशा प्रत्येक ठिकाणी टोकाची दुश्मनी झाली. रक्‍तरंजित संघर्ष झाला.  तो पुढच्या पिढीतही तसाच राहिला. मदनदादा भोसले व मकरंदआबा पाटील यांच्यातही तोच संघर्ष सुरु राहिला. भाऊ व तात्या निदान समोर भेटले तर एकमेकांशी बोलायचे. दादा व आबा मात्र समोर दिसले तरी एकमेकांशी कधी बोलले नाहीत. गेल्या 20 वर्षांत दोघांनी एकमेकांना साधा फोनही केला नाही. एवढा उभा दावा राजकारणाने साधला. 

कृष्णाकाठच्या पाण्यामध्ये लढाईची रग जेवढी आहे तेवढीच नात्यातली संवेदनशीलताही आहे. कौटुंबिक जिव्हाळ्याचे विषय जेव्हा जेव्हा निघाले तेव्हा भोसले व पाटील या दोन्ही घराण्यांनी ही संवेदनशीलता जपली. एकमेकांच्या सुख-दु:खात दोघेही सामील झाले. त्याची प्रचिती बुधवारी पुन्हा आली. लक्ष्मणराव पाटील अत्यवस्थ आहेत. प्रतिभा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या वार्तेने प्रतापरावभाऊ अस्वस्थ झाले. आयुष्याच्या संध्याकाळी कढ उतरुन ठेवावा असाच हा प्रसंग. भाऊंनी प्रतिभा हॉस्पिटल गाठले. अतिदक्षता विभागात ते लक्ष्मणराव पाटील यांच्यासमोर उभे राहिले. ‘लक्ष्मणराव’ अशी नेहमीच्या धाटणीची हाक भाऊंनी मारली. तत्क्षणी तात्यांचे डोळे किलकिले झाले आणि भाऊंच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले. राजकीय दुश्मनीच्या जन्मापूर्वीची गाजलेली मैत्री अश्रूत धुवून निघू लागली. जड पावलांनी प्रतापरावभाऊ बाहेर पडले.   संध्याकाळी मदनदादा भोसले हेही प्रतिभा हॉस्पिटलमध्ये आले. 20 वर्षांत ते व मकरंद पाटील कधीच बोलले नव्हते. मात्र, दोघेही समोरासमोर आले. काही क्षण एवढा अबोला पसरला की कृष्णेचे दोन्ही प्रवाह स्थिर व्हावेत. दोघांनीही एकमेकांचे हात हातात घेतले आणि प्रथमच दोघे बोलते झाले. त्यामध्ये काळजीचा, आपुलकीचा सूर राहिला. मकरंद आबांनीच मदनदादांना तात्यांकडे नेले. तात्यांसमोर उभे राहून मदनदादांनीही ‘तात्या, मी मदन’ अशी हाक मारली. तेव्हाही तात्यांनी डोळे किलकिले केले. स्थिरावलेल्या कृष्णेच्या पाण्याला अचानक गहिवर यावा अशी संध्याछाया पसरली.

कृष्णाकाठचा राजकीय संघर्ष पुढेही सुरुच राहील, नव्हे तो राहिलाच पाहिजे. मात्र, या संघर्षातही नात्यांचा ओलावा टिकून रहायला हवा. पूर्वसुरींनी एकत्रित केलेले काम स्मरण करुन कृष्णाकाठच्या या दोन्ही नेत्यांनी  हातात घेतलेले हात खिलाडूवृत्तीने  सांभाळावेत, हेच या भेटीचे म्हणणे पडले.