Thu, Dec 03, 2020 06:17होमपेज › Satara › माण राष्ट्रवादीची ‘मान’ बारामतीत

माण राष्ट्रवादीची ‘मान’ बारामतीत

Last Updated: Oct 27 2020 1:37AM
सातारा : पुढारी वृत्तसेवा 

संपूर्ण सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सातत्याने यश मिळत असताना माण मतदारसंघात पक्षांतर्गत सुंदोपसुंदीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पिछाडीवर आहे. हे चित्र बदलण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनीच सोमवारी बैठक बोलावली. त्यामुळे राष्ट्रवादीची माणमधील ‘मान’ बारामतीत होती. शरद पवारांनी गोळ्या-मेळ्याने राहण्याचे आदेश दिले.  

त्याचे असे झाले की, गत आठवड्यात मुंबईत विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे वेळ मागितली. माणचा विषय मिटवला पाहिजे. पक्षांतर्गत असलेले वादविवाद थांबल्याशिवाय माणमध्ये आपल्याला यश येणार नाही, असा सूर रामराजेंनी आळवला. पवारांनीही ते गांभीर्याने घेतले. त्यानुसार सोमवारी सायंकाळी पवारांनी राष्ट्रवादीचे माणचे पदाधिकारी व सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना थेट बारामतीला बोलावून घेतले. या बैठकीत माणमध्ये असलेल्या पक्षातील मतभेदाबाबत चर्चा झाली. विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर, पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. 

बैठकीत माण मतदारसंघात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले वर्चस्व नंतर झालेले बदल व विद्यमान परिस्थिती यावर चर्चा झाली. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत व त्यानंतरही घडलेल्या घटनांवरही बैठकीत उहापोह झाला. माण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवायची असेल तर गट-तट बाजूला ठेवून एकत्र येवून काम करा. अन्य मतदारसंघात यश मिळते आणि माणमध्येच का नाही? असा सवालही पवारांनी केला. तुम्ही गोळ्या-मेळ्याने राहिला तर पक्ष वाढेल हे सांगायलाही ते विसरले नाहीत.