सातारा : प्रतिनिधी
सातारा लोकसभा मतदारसंघातून आपले बंधू खासदार उदयनराजे भोसले यांना थेट विरोध करणार्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज सातार्यात भाजपचे संभाव्य उमेदवार व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासोबत मिसळीचा आस्वाद घेतला. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दोन नेत्यांची राजकीय मिसळ ही चर्चेचा विषय ठरली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले व समर्थकांनी बारामतीत जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर शिवेंद्रराजे समर्थकांनी राष्ट्रवादीसाठी तीन पर्यायही सुचवले होते. शरद पवारांनी फलटण येथे काल शुक्रवारी बोलवलेल्या आमदारांच्या बैठकीला शिवेंद्रराजे गैरहजर राहिले. याच कालावधीत भाजपने अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात नरेंद्र पाटील अशी लढत झाल्यास ती कडवी लढत होणार आहे.
नरेंद्र पाटील सातारा लोकसभा मतदारसंघात भेटी गाठी घेऊन कानोसा घेत आहेत. पाटील हे आज, शनिवार सातार्यात आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई व विजय शेलार यांच्यासमवेत ते गप्पा मारत असतानाच शिवेंद्रराजे भोसले तिथे आले. दोघांमध्ये गप्पा रंगल्या असतानाच मिसळीचा विषय निघाला. त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले यांच्या गाडीत बसूनच नरेंद्र पाटील सातार्यातील सुप्रसिध्द चंद्रविलास हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी एकत्र आले. शरद पवार यांच्या भेटीला न गेलेले शिवेंद्रराजे भाजपच्या नरेंद्र पाटलांसोबत मिसळ खाताना पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय मिसळ चर्चेचा विषय बनली आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना नरेंद्र पाटील म्हणाले, शिवेंद्रराजे माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत मिसळ खाण्याची मजा और आहे. शिवेंद्रराजे म्हणाले, सध्या माझं काम टेन्शन घ्यायचं नाही तर टेन्शन द्यायचं आहे. नरेंद्र पाटील हे माझे मित्र आहेत. त्यांच्यासोबत आज खाल्लेली मिसळ नक्कीच गोड हाेती असे ते म्हणाले.