Sat, Nov 28, 2020 20:00होमपेज › Satara › अजिंक्यतार्‍यावर बिबट्याचा वावर 

अजिंक्यतार्‍यावर बिबट्याचा वावर 

Published On: Dec 04 2017 1:33AM | Last Updated: Dec 03 2017 10:42PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा शहरालगत असलेल्या किल्ले अजिंक्यतार्‍यावर  फिरावयास गेलेल्या नागरिकांना दक्षिण दरवाजा परिसरात दोन बिबट्यांचे दर्शन झाले.

अजिंक्यतार्‍यावर सकाळी व सायंकाळच्या सुमारास दररोज अनेकजण फिरावयास जात असतात. संजय माने व सहकारी शनिवारी सायंकाळी  5.30 वाजण्याच्या सुमारास किल्ल्याच्या दक्षिण दरवाजाच्या परिसरात असेच फिरावयास गेले होते. त्यावेळी त्यांना चक्क दोन बिबट्यांचे दर्शन घडले. समोर साक्षात बिबट्याला पाहून त्यांचा  थरकाप उडाला. भीतीतून थोडेसे सावरल्यानंतर त्यांना बराच वेळ हे बिबटे परिसरात वावरताना दिसत होते. त्यामुळे किल्ले अजिंक्यतारा परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले असून नागरिकांनी अजिंक्यतारा परिसरात फिरताना काळजी घेणे गरजेचे आहे. 

काही नागरिकांनी याबाबतची कल्पना वन विभागाला दिली असून वन अधिकार्‍यांनी याबाबतची घबरदारी घेऊन या परिसरात पिंजरे लावावेत, अशी मागणी नागरिकांमधून   होत आहे.

वनविभागाकडून दुजोरा

अजिंक्यतारा किल्ले परिसरात शनिवारी बिबट्या दिसल्याच्या घटनेला वनविभागानेही दुजोरा दिला आहे. याबाबत सातार्‍याचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाटील यांनी सांगितले की, किल्ल्याच्या परिसरात बिबट्याचा वावर आहे. हा बिबट्या दररोज सुमारे 40 कि.मी. भटकंती करत असून नागरिकांना  खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.