सातारा ग्रामपंचायतींसाठी उद्या धुमशान

Last Updated: Jan 13 2021 11:27PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यात प्रचाराचे धुमशान चांगलेच रंगले होते. शुक्रवारी मतदान होत असून  उमेदवार व पॅनल प्रमुखांची धाकधुक वाढली आहे. गावगाडा चालवणार्‍या कारभार्‍यांना निवडून देताना मतदारांना मात्र चांगलेच सजग रहावे लागणार आहे. 

सातारा जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी माघार घेतली. अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे 654 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. मात्र, निवडणुक लागलेल्या गावागावांत हे धुमशान घोंगावत आहे. त्यामुळे या गावांमध्ये निवडणुकीचा माहोल टोकाला गेला आहे. सत्तेसाठी मतदारांना विविध आश्‍वासने दिली जात आहेत.  पहिल्या टप्प्यात पॅनेल टू पॅनेल मते मागणारे उमेदवार शेवटच्या टप्प्यात वैयक्तिक मतांसाठी फिल्डिंग लावत आहे. यामुळे काही गावातील प्रभागा प्रभागात पॅनेल फुटून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पॅनेलप्रमुखांनी याची धास्ती घेतलेली आहे. खुल्या गटातील सर्वच लढती चुरशीने होत आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आपापल्या स्थानिक आघाड्यांनी गावच्या मंत्रालयावर झेंडा फडकवण्यासाठी कंबर कसली आहे. प्रचार शिगेला पोहोचला होता. उमेदवारी अर्ज भरल्यापासून कार्यकर्त्यांसाठी सुरू झालेल्या जेवणावळी मतदानानंतरच थांबणार आहेत. जिल्ह्यात दुरंगी आणि अपवादात्मक स्थितीत तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत. 

चुरस विकासामध्येही दिसणार का?

ग्रामपंचायतींच्या धुमशानामुळे गावोगावी चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. गावागावांत निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे गावातील गटातटात चुरस वाढली. ही चुरस निवडणुकीनंतर गावच्या विकासाच्या राजकारणातही दिसली पाहिजे. त्यासाठी निवडून जाणारे कारभारी सक्षम व गाव विकासाचा ध्यास घेतलेले असले पाहिजेत. तसेच सजग असलेले कारभारी निवडून देणे हे गावातील प्रत्येक मतदारांचे कर्तव्य असल्यामुळे मतदार राजा कुणाकुणाला कौल देणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.