Tue, Aug 11, 2020 21:52होमपेज › Satara › कराडात जनशक्‍तीपुढे भाजप नमले

कराडात जनशक्‍तीपुढे भाजप नमले

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 08 2017 10:39PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

महिनाभरापासून सुरू असलेल्या आरोप - प्रत्यारोपानंतर शुक्रवारी बहुमताचा आदर राखत सूचना मंजूर करण्याची भूमिका नगराध्यक्षांनी घेतली. त्यामुळे जनशक्‍तीने बाजी मारत भाजपला बॅकफुटवर जावे लागल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. दरम्यान, विषय कोणी वाचायचे? यावरून जनशक्‍ती आणि भाजपात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली होती. अखेर कमराबंद चर्चेनंतर जनशक्‍तीची मागणी नगराध्यक्षांनी मान्य केली आणि सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. 

मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी स्वच्छता अभियानाची माहिती दिली. त्यानंतर भाजपचे नगरसेवक सुहास जगताप यांनी विषय वाचण्यास सुरुवात केली. याला उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, राजेंद्रसिंह यादव, विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, शारदा जाधव तसेच जनशक्‍ती आघाडीच्या इतर नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर बहुमतात असलेली जनशक्‍ती आघाडी आणि सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची बैठकीत हमरीतुमरी पाहण्यास मिळाली.

सूचना - उपसूचना कोणी मांडायची? आणि त्याबाबत नेमका काय नियम आहे? असे प्रश्‍न उपस्थित झाल्याने या विशेष सभेचा मूळ विषयच बाजूला पडला होता. सूचना मांडण्याचा अधिकार फक्‍त बहुमतात असणार्‍या आघाडीलाच असून अम्ही हे खपवून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा उपनगराध्यक्षांनी घेतला, तर भाजपचे विनायक पावसकर यांनीही दादागिरीची भाषा अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांना सुनावले. अनुमोदन द्यायचे की नाही ते बघा, असे पावसकर यांनी सांगितल्याने जनशक्‍तीकडून नगराध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असा आग्रह धरण्यात आला.   सर्व नगरसेवक आणि नागरिकांच्या सहभागाशिवाय कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. राजेंद्र यादव यांनी शहरातील विकासकामांबाबत राजकारण आणले जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्‍त केली. 

सौरभ पाटील यांनी नगरसेवकांना थांबवले

वादामुळे सभागृह सोडणार्‍या नगरसेवकांना लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी थांबवले. वादात हस्तक्षेप करताना त्यांनी सूचना कोणी मांडायची? याबाबत वादविवाद न करता शहराच्या हितासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. जर विषयांची चर्चाच होणार नसेल तर आपण विकास कसा करणार? असा प्रश्‍नही सौरभ पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.