होमपेज › Satara › दहिहंडी उत्सवाचे ‘थर’ कोसळण्याची चिन्हे

दहिहंडी उत्सवाचे ‘थर’ कोसळण्याची चिन्हे

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 30 2018 11:14PMखेड : अजय कदम

सण आणि उत्सवावर लादण्यात आलेल्या जाचक अटींमुळे दहिहंडीच्या उत्सवाचे ‘थर’ कोसळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सार्वजनिक उत्सवांवरील निर्बंधामुळे स्थानिक गणेशोत्सव मंडळांसह युवा मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने अथवा पोलिसांनी तातडीने नियमांची यादी जाहीर करुन संभ्रम दूर करावा, अशी मागणी होवू लागली आहे.

गोकूळ अष्टमीला दहिहंडी उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. शहर, उपनगर तसेच लहान - मोठ्या गावांमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. युवकांबरोबर युवतींचाही यामध्ये सहभाग असतो. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष व नेतेमंडळी दहिहंडीच्या आयोजनात सहभाग घेतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या उत्सवातील धोकादायक मुद्यांमुळे अनेक वाद निर्माण झाले होते. न्यायालयानेही काही निर्बंध घातले आहेत. असे असताना या खेळ प्रकाराला साहसी क्रीडा स्पर्धेत सहभागी करण्याची मागणी होत होती. ही मागणी शासनाने दि. 11 ऑगस्ट 2015 रोजी शासन निर्णयाद्वारे मान्य केली होती.

दहिहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देतानाच शासनाने काही नियमही घातले आहेत. त्यात पहिली अट आहे ती 12 वर्षांखालील मुलांना यात सहभागी होता येणार नाही. 12 ते 15 वयोगटातील मुलांना चौथा व त्यावरील थरांवर उभे रहायचे असल्यास त्यांच्या संघ व्यवस्थापनाने पालकांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. स्पर्धेत भाग घेणार्‍या खेळाडूंचा वैयक्तिक विमा तसेच स्पर्धेचाही विमा स्पर्धा आयोजकांना काढावा लागणार आहे. स्पर्धेतील खेळाडूंना दुखापत होवू नये, यासाठी चेस्ट गार्ड, हेलमेट, सेफ्टी बेल्ट,  सेफ्टी हारेनस या साधनांचा वापर आवश्यक आहे. तसेच दहिहंडीचे आयोजन करणार्‍यांनी त्या ठिकाणी तातडीचे वैद्यकीय पथक, मॅट, पाण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेट व्हॅन, पोलिस बंदोबस्त ठेवणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धेसाठी योग्य व मुबलक जागा व सुरक्षा व्यवस्था करणेही गरजेचे राहणार आहे. तसेच दहिहंडीसाठी अग्निशामक दल, पोलिस व वाहतूक पोलिस व परिवहन खात्याची परवानगी घेणेही आयोजकांना बंधनकारक करण्यात आले आहे.

क्रीडा स्पर्धेबरोबरच उत्सवानिमित्त होणार्‍या दहिहंडीबाबत या सूचना लागू असल्याबाबत मात्र स्पष्ट खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलिस काय भूमिका घेणार? यावर बरेच अवलंबून आहे. मात्र, नियमावलीमुळे दहिहंडी उत्सवाबाबत युवा वर्गात  संभ्रमावस्था आहे ती दूर करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याची मागणी होवू लागली आहे.