Tue, Aug 11, 2020 21:47होमपेज › Satara › थंडावा शोधताना आरोग्याचीही काळजी

थंडावा शोधताना आरोग्याचीही काळजी

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 8:51PMकराड : प्रतिनिधी 

होळी संपली आणि उकाड्याची काहिली सुरू झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उकाडा अधिक जाणवेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे या उकाड्याला तोंड देताना घालावयाचे कपडे इथपासून शरीराला थंडावा देणारी शीतपेय आदी खबरदारी घेताना नागरिक दिसत आहेत.  गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे उकाडा जाणवू लागला आहे. दिवसभर कडक ऊन पडत असल्याने रस्त्यावर फिरताना जीवाची काहिली होत आहे.

यातच यावर्षी एप्रिल, मे मध्ये उकाड्याची तीव्रता अधिक असेल असा अंदाज वर्तविला जात असल्याने नागरिक आत्तापासूनच बेचैन झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर कडक उन्हापासून संरक्षण करणारे कपडे तसेच शरीराला गारवा देणारी शीतपेय यांची मागणी वाढली आहे. कराड शहरात ठिकठिकाणी लिंबू सरबत, फळांचे ज्यूस, ऊसाचा रस यांचे हातगाडे लागले आहेत. बाजारपेठेत सुती कपडे, टोप्याही विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. 

शरीराला थंडावा देणारी कलिंगड मोठ्याप्रमाणात शहरात विक्रीसाठी आली आहेत. रामपूर, कुंडल, भाळवणी, आळसुंद आदी ठिकाणाहून ही कलिंगड आली आहेत.तीस रूपयांपासून शंभर रूपयांपर्यंत या कलिंगडाचे दर आहेत. सात ते आठ हजार रूपये टनाने ही कलिंगड मिळत असल्याचे शहरातील कलिंगड व्यापारी वाहाब मोमीन यांनी सांगितले. पुढील काही दिवसांत कलिंगडाचे दर वाढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. बाजापेठेत उन्हातून फिरून झाल्यानंतर शरीराला थंडावा देण्यासाठी नागरिकांची पावले शीतपेयांच्या हातगाड्याकडे वळतात. यातही लिंबू सरबर, ऊसाचा रस किंवा  फळांचे ज्यूस याला पसंती दिली जात  आहे. लिंबू पाणी किंवा ऊसाचा रस घेण्याने शरीलाला काही अपाय होत नसल्याने याच पेयांना अधिक पसंती दिली जात आहे. 

उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मातीचे मटकेही बाजारात विक्रीसाठी आले आहेत. दिडशे रूपयांपासून चारशे रूपयांपर्यंत लहान मोठ्या आकाराचे हे मटके आहेत. फ्रिज घरी असला तरी या दिवसात मातीचे मटके काहीजण हमखास घरी नेतात. यातील थंड पाणी शरीराला बाधत नाही, त्यामुळे मातीच्या मटक्यांची विक्री यावर्षी मोठ्या प्रमाणात होईल, असे सुशांत कुंभार यांनी सांगितले. 
एकूणच उन्हाळ्याचा सामना करताना आरोग्याचीही काळजी नागरिक घेताना दिसत आहेत.