Wed, Jul 08, 2020 10:41होमपेज › Satara › कासच्या सौंदर्याला लागलीय द‍ृष्ट

कासच्या सौंदर्याला लागलीय द‍ृष्ट

Published On: Jun 05 2018 1:18AM | Last Updated: Jun 04 2018 11:21PMसातारा : महेंद्र खंदारे

गेेल्या काही वर्षांपासून कास पठाराच्या सौंदर्याला कुणाची तरी नजर लागली आहे.  पठाराच्या परिसरात होणारी अतिक्रमणे, जंगली प्राण्यांच्या शिकारींचे वाढते प्रमाणे, बेसुमार होणारी वृक्षतोड आणि आधुनिक जीवन शैली यामुळे या पठारावर फुलांची संख्या कमी होत गेली आहे. पठारावर 280 हून अधिक प्रजातींची फुले उमलतात. त्यातील सुमारे 50 प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. त्यामुळे याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. पठाराचे संर्वधन झाले तरच कासचा हेरिटेज दर्जा कायम राहिल.

कास पुष्प पठाराला 2012 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. त्यामुळे हे पठार जगामध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे देशाच्या कानाकोपर्‍यासह देशभरातून फुलांची मांदियाळी पहायला पर्यटक येत असतात. हेरिटेजचा दर्जा प्राप्‍त झाल्यांतर पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे पठाराच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कास पठाराला हेरिटेजचा दर्जा मिळाल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढल्याने नव नवीन समस्या निर्माण झाल्या. त्यामध्ये प्रामुख्याने सातारा-कास रस्त्यालगत वाढणारी अतिक्रमणे, शिकारींचे वाढते व वृक्षतोड या दोन गोष्टी चिंताजनक आहे. कास पठार आता मोठे पर्यटन स्थळ झाल्याने आता परिसरात हॉटेल व बांधकामांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. ही सर्व अतिक्रमणे पठारावरील फुलांच्या उमलण्यासाठी धोकादायक आहे. 

ही अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली होणे आवश्यक आहेत. मात्र, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय नसल्याने अतिक्रमण जैसे थे आहे. हा परिसर ग्रीन झोनमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने बांधकामास  रोख लावण्यात आली आहेत. तरीही पर्यावरणाचा विचार न करता रेटून बांधकामे केली जात आहेत. यासाठी आता राज्य सरकारनेच लक्ष घालण्याची मागणी होत आहे. अतिक्रमण करून हॉटेल मोठ्या प्रमाणात बांधण्यात येत असल्याने हॉटेलमधील सांडपाण्याने जमिनीची सुपीकता संपून एखाद्या विशिष्ट भागावरील फुलांचे उमलण्याचे प्रमाण कमी झाले आहे. 

कास आणि बामणोली पट्ट्यात झाडांची संख्या मोठी आहे. या जंगलांमध्ये बरीच जंगली श्‍वापदे व पक्षी आहेत. या जनावरांच्या माध्यमातूनच परिसरात उमलणार्‍या बीजांचा प्रवास होत असल्याने फुले उमलण्याचे क्षेत्र वाढते. मात्र, कास व बामणोली परिसरातील जनावरांच्या शिकारीचे प्रमाणही वाढल्याने बीजांचा प्रसार रोखला आहे. वन विभागाकडून जरी शिकार्‍यांच्या अटकेचे सत्र सुरू असले तरी हे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. 

अतिक्रमण, शिकार व वृक्षतोड ही प्रमुख समस्या आहे. याकडे लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. अन्यथा औट घटकेचा हेरिटेज दर्जा अशी म्हणण्याची वेळ येऊ नये. प्रसंगी कडक निर्णय घेऊन जिल्ह्याच्या व देशाच्या नावलौकीकात भर घालणार्‍या या वास्तूची जपणूक करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे हे आता सर्वांनी ओळखण्याची आवश्यकता आहे.