Fri, Jul 10, 2020 03:10होमपेज › Satara › डायलॉगबाजीत रंगले जिहे-कठापूरचे रणकंदन

डायलॉगबाजीत रंगले जिहे-कठापूरचे रणकंदन

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 10:27PM

बुकमार्क करा

खटाव : अजय अं. कदम 

खटाव आणि माण या दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणारी जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना गेल्या 20 वर्षांपासून निधीअभावी रखडली आहे. योजना पूर्ण होण्याची आश्‍वासने ऐकून दुष्काळी जनता वैतागली असतानाच जिहे-कठापूरला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविण्यात सध्याच्या सरकारला यश आले आहे. परवा पुसेगावात एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेल्या विविध पक्षांच्या  मंत्री आणि आमदारांमध्ये चांगलेच वाक:युध्द रंगले. एकमेकांना टोमणे मारत त्यांनी  केलेल्या डॉयलॉगबाजीने जिहे-कठापूरचा ब्लॅकबस्टर शो गर्दी खेचणारा ठरला.  

सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवा निमित्त राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनावेळी ही शेरेबाजी झाली. जिहे-कठापूर पाणी योजनेवरुन या कार्यक्रमात चांगलीच राजकीय टोलेबाजी झाली. देवस्थानचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांनी जिहे-कठापूर  योजना रखडली असल्याचे सांगून योजना पूर्ण करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली. डॉक्टरांनी हात घातलेल्या या विषयाला माण खटावचे आ. जयकुमार गोरेंनी चांगलेच उचलून धरले. आघाडीच्या काळात आम्ही या योजनेला अधिक निधी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, योजनेच्या वाढीव खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता देवू न शकल्याबद्दल खंत व्यक्त केली. आता सुप्रमा दिली आहे त्याबरोबर निधीही द्या, अशी मागणी करत त्यांनी त्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

आ. गोरेंनी चक्क पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांनी योजनेला सुप्रमा मिळवण्याचे प्रयत्न केल्याचे सांगत बापूंवर स्तुतीसुमने उधळली. गेली तीन वर्षे पालकमंत्री आणि आ. गोरे यांची कडाकडी पाहणार्‍या जनतेला हा प्रसंग सुखद धक्का देणारा ठरला. आघाडीच्या काळात या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता का मिळाली नाही? याबद्दल आ. शशिकांत शिंदे यांच्याकडे तिरक्या नजरेने पहात गोरेंनी  सूचक वक्तव्यही केले.

यावर आ. शशिकांत शिंदे यांनी तुफान बॅटींग केली.जलसंपदा मंत्री म्हणून मला 9 महिन्यांचा कालावधी मिळाला. त्या कालावधीत जिहे-कठापूर योजनेविषयी जे काही करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न केला. आघाडीच्या काळात आमचे आणि काँग्रेसचे थोडे जुळत होते, तुमचे किती जुळते हे माहित नाही? असे सेना आणि भाजपाच्या नाजूक संबंधावर त्यांनी भाष्य करताच सभेत एकच हलकल्लोळ उडाला.

यानंतर पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी जिहे-कठापूर  युतीच्या काळात सुरु झाल्याचे सांगत ही योजना  आम्हीच पूर्ण करणार, असे कॉलर उडवून ठसक्यात सांगितले. योजनेला सुप्रमा आम्ही दिली आहे, हे विसरु नका असे सांगतानाच तुमच्यामुळे नाही तर आमच्यामुळेच जिहे-कठापूरचे पाणी येणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. मी दबंग मंत्री आहे, दुष्काळी तालुक्यांसाठी केंद्राकडून निधी मिळविला असल्याचेही त्यांनी त्यांच्या हटके  स्टाईलमध्ये सांगितले.

यावर पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिहे-कठापूर  योजना आम्हीच पूर्ण करणार आणि  2019 मध्ये  सेवागिरीला जिहे-कठापूरच्याच पाण्याचा जलाभिषेक करणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. ही योजना युतीच्या काळात मंजूर झाली. आ. गोरे आणि आ. शिंदे यांनीही या योजनेसाठी आघाडीच्या काळात प्रयत्न केल्याचे त्यांनी मनाचा  मोठेपणा दाखवत  मान्य केले.

आ. जयकुमार गोरे मला नेहमी लबाड पालकमंत्री म्हणतात मात्र,  भाषणात त्यांनी माझी केलेली स्तुती ऐकून बरे वाटले असे सांगितले. मंत्री एकनाथ शिंदे यांनीही या योजनेला आम्ही पूर्णत्वास नेणार, असे सांगत जमलेल्या जनतेला आशेचा किरण दाखवला. एकूणच युतीच्या मंत्र्यांनी आणि आघाडीच्या आमदारांनी जिहे-कठापूरबाबत केलेल्या डॉयलॉगबाजीने जनतेचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले.