Sun, Jul 12, 2020 17:15होमपेज › Satara › वाढीव बिलांच्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ

वाढीव बिलांच्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ

Published On: Jul 28 2018 1:41AM | Last Updated: Jul 27 2018 10:33PMसातारा : विशाल गुजर

सातारा शहर व परिसरामध्ये अव्वाच्या सव्वा विद्युत बिले येण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मीटर तपासणीच्या नावाखाली महावितरणकडून नागरिकांची ससेहोलपट होत आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे प्रत्येक महिन्याला वीज बिल आले की महावितरणच्या दारात जावे लागत असून याबाबत अधिकार्‍यांना विचारणा केली असता ‘अहो... तुमचा मीटरंच फॉल्टी आहे!’  असे बिनधास्त उत्तर दिले जाते. 

ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी सोडवण्यासाठी महावितरण सक्षम नसल्यानेच कारभाराचे तीन-तेरा वाजले आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सातारा शहर व परिसरातील ग्राहकांना वाढीव वीज बिलांचा फार ताप होत आहे. गत महिन्याचे बिल भरले असताना व अनावश्यक वापर नसतानाही अव्वाच्या सव्वा वीज बिल येत आहेत. त्यामुळे ग्राहकांची  प्रत्येक महिन्याला महावितरण वारी ठरलेली आहे. कमी युनिट जळाले तरी भरमसाठ बिल येत असल्याने वीज वापरायची की नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. जुने मीटर काढून जे नवीन मीटर बसविण्यात आले आहेत त्यातील 90 टक्के मीटर हे सदोष असल्याने त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अधिकार्‍यांकडे तक्रार करण्यास गेले तर अधिकारी व कर्मचार्‍यांकडून उद्धट उत्तरे मिळत आहेत. याशिवाय जास्त बिल का आले? असे विचारले असता तुमचा मीटरंच फॉल्टी असून तो दुरुस्त करून घ्या, अशी उत्तरे दिली जात आहेत. योग्य मार्गदर्शन केले जात नसल्याने कर्मचारी व ग्राहकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडू लागले आहेत. शहर उपनगरातील सर्वच भागामध्ये अशा समस्या भेडसावू लागल्याने महावितरणच्या कार्यालयात तक्रारी करण्यासाठी गर्दी होत आहे.

महावितरणचे प्रमुख कार्यालय असणार्‍या प्रतापगंज पेठ येथे तर तक्रारीसाठी नागरिकांच्या रांगाच लागलेल्या असतात. तक्रारींचे निवारण करण्यासाठी तीन टेबलवर कर्मचारी असूनदेखील ग्राहकांच्या तक्रारींकडे त्यांचे दुर्लक्ष असते. त्यामुळे ग्राहकांना ताटकळत बसावे लागत आहे. कर्मचार्‍यांकडून टाळाटाळ होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तक्रार करण्यासाठी येणार्‍यांमध्ये वृद्ध लोकांचे प्रमाण जास्त असून त्यांची दखलच घेतली जात नसल्याचे चित्र दिसत आहे. एखादा ग्राहक वीज बिल घेऊन गेल्यास त्याला मीटर फॉल्टी असून मीटरची तपासणी करण्याचा सल्ला दिला जात आहे.

सातारा पंचायत समितीच्या कार्यालय परिसरात असणार्‍या महावितरणच्या कार्यालयामध्ये मीटर तपासणीसाठी अर्ज द्यावा लागतो. चांगल्या मीटरची तपासणी करण्यासाठी 250 रुपये शुल्क घेतले जाते. अर्ज केल्यानंतरही येथील कर्मचारी एक- दोन दिवस नव्हे तर चक्क आठ दिवसांनी येतात व मीटर पुन्हा लावण्यास साधारण 15 दिवसांचा कालावधी लावतात. या वेळेमध्ये ग्राहक रोज मीटरची चौकशी करण्यासाठी या कार्यालयात हेलपाटे मारतात. त्यावेळी त्यांना तुमच्या मीटरची तपासणी होण्यास वेळ आहे. चार दिवसांनी या नाहीतर फोन करून या, अशी बोळवण केली जाते. 
महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कोणाचाही अंकुश नसल्याने ग्राहकांना त्यांच्या मनमानी कारभाराचा त्रास सहन करावा लागत असून सर्वसामान्य नागरिकांची दखल कोण घेणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.