Fri, Jul 10, 2020 01:30होमपेज › Satara › सावधान...मृत्यूचे तांडव वाट पाहतेय

सावधान...मृत्यूचे तांडव वाट पाहतेय

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 8:42PMसातारा : विशाल गुजर

सातारा जिल्हा हा सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेला आहे. पर्यायाने दळणवळणासाठी घाटातील रस्त्यांचा वापर अनिवार्य आहे. परंतु घाटातील रस्ते, कठडे व सूचना फलक यांच्या अवस्था पाहिल्यास घाटातच जास्त अपघात का होत आहेत, याचे उत्तर निश्‍चितच मिळू शकेल. यात घाट रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात घटना घडल्या आहेत. त्यामुळे बहुतांश घाट रस्ते हे मृत्यूचे सापळे बनले आहेत. अनेक अपघातांतून हे वारंवार सिद्ध झाले आहे. 

पोलादपूरच्या दुर्घटनेने जिल्ह्यातील घाट रस्त्यांचा प्रश्‍न नव्याने ऐरणीवर आला आहे. सातारा जिल्ह्याचा पश्‍चिमेकडील भाग सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत विसावला आहे.  येथील थंड वारा अन बोचरी हवा घेण्यासाठी अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासह, मित्र परिवारासह भेटी देत असतात. मात्र, या पर्यटनस्थळावरील घाट रस्ते धोकादायक ठरू लागले आहेत. 

घाटातील रस्ते अरुंद...

जिल्ह्यात अनेक गावे डोंगरदर्‍यात वसली आहेत. शासनाच्या गाव तिथे रस्ता या संकल्पनेतून अनेक गावे, तालुके, जिल्हे, महामार्ग जोडण्यासाठी बांधकाम विभागाच्यावतीने रस्ते बनविण्यात आले. काही ठिकाणी डोंगर खणून रास्ते तयार करण्यात आले. मात्र, यात ज्या ठिकाणी वाहतूक मोट्या प्रमाणात आहे. त्याठिकाणचे अनेक रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक धोकादायक बनली आहे. अनेकजण तो माझ्या पुढे गेला म्हणून मी कमी बापाचा होऊ नये म्हणूनही गाडी वेगात पळवून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. त्यातून अनेक अपघात घडत आहेत. त्यासाठी अरुंद रस्त्यावर काळजी घेऊनच वाहने चालवणे गरजेचे आहे.

रस्त्याची दूरवस्था...

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने आणि ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून रस्त्यावर पडलेल्या खड्डयांना चुकवताना अपघात होत आहेत. खड्डे पडले तरी त्यावर फक्त मलमपट्टी करण्यात येते. परंतु पाऊस पडल्यानंतर या रस्त्यांनी दयनीय अवस्था होत आहे. त्यामुळे ठेकेदारांनी उत्कृष्ट काम गरणे महत्त्वाचे आहे.

पावसाळ्यात दरडी कोसळतात...

सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिमेस मोठ्या प्रमाणात पाऊस व सोसाट्याचा वारा असतो. पावसाळ्यात हा परिसर हिरवागार शालू नेसतो. या परिसरातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे राज्यभरातील पर्यटक येत आहेत. मात्र, या मार्गावर असणार्‍या घाटात आणि ठिकठिकाणी असणार्‍या रस्त्यावर छोट्या-मोट्या दरडी कोसळत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होते असून रस्त्यावर येणार्‍या दगड चुकविताना आणि आलेल्या मातीतून वाहन सरकल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच या घाटरस्त्यावरील धोकादायक झाडे, दरडी काढणे गरजेचे आहे.

दिशादर्शक फलकांचा अभाव...

जिल्ह्यात असणार्‍या अनेक घाटामध्ये वळण क्षेत्र, अरुंद रस्ता, वाहनाची वेग मर्यादा, तीव्र उतार आदी दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे पण बांधकाम विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. त्यातच रस्त्यावरील पांढर्‍या कलरच्या पट्ट्या आखल्या नाहीत. तर अनेक ठिकाणी साईटपट्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने यावर तातडीने धोकादायक ठिकाणी फलक लावून घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत झालेले अपघात हे घाट रस्त्यावर झाले आहेत. त्यामुळे घाटातून वाहन चालवताना खबरदारी घेणे गरजेची आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणे, वेगाने वाहन चालवीने यासह अनेक घटना घडत आहेत. 

असे आहेत जिल्ह्यातील घाट रस्ते...

यात सातारा तालुक्यात सातार्‍याहून ठोसेघरकडे जाणारा बोरणे घाट, कासकडे जाणारा यवतेश्‍वर घाट, रेवंडे गावाकडे जाणारा रेवंडे घाट, जावली तालुक्यात मेरूलिंग घाट, मार्ली घाट, कुसुंबी कोळघर घाट, केळघर घाट, कुडाळकडून पाचगणीस जाणारा काटवली घाट, वाई तालुक्यात वाईकडून पाचगणीस जाणारा पसरणी घाट, वाई मांढरदेव रस्त्यावरील मांढरदेव घाट, वाई ते वाठार स्टेशन मार्गावरील शिरगाव घाट, महाबळेश्‍वरकडून महाडला जाणारा पोलादपूर (आंबेनळी) घाट, फलटण तालुक्यात फलटण ते दहिवडी मार्गावर असणारा मोगराळे घाट, फलटणकडून पुसेगावकडे जाताना सातवडा घाट, खंडाळा तालुक्यात सातारा पुणे महामार्गावरील खंबाटकी घाट, लोणंदहुन सातारकडे जाताना सालपे घाट, माण तालुक्यात दहिवडी शिंगणापूर रोडला असणारा वावरहिरे घाट, शिंगणापूरकडून नातेपुतेकडे जाताना नातेपुते घाट, खटाव तालुक्यात सातारा खटाव रस्त्यावरील वर्धनगड घाट, कराड तालुक्यात सातारा- सांगली जिल्ह्यास जोडणारा सुर्ली घाट तर पाटण तालुक्यात कराड चिपळूण मार्गावर कुंभार्ली घाट, विहे घाट, ढेबेवाडीकडून बनपुरीला जाताना दिवशी घाट असे सातारा जिल्ह्यात घाटरस्ते आहेत.