Mon, Jan 25, 2021 15:41होमपेज › Satara › राष्ट्रीय महामार्गाचे जबरदस्तीने काम केल्यास आत्मदहन करू

राष्ट्रीय महामार्गाचे जबरदस्तीने काम केल्यास आत्मदहन करू

Published On: Dec 07 2017 1:30AM | Last Updated: Dec 06 2017 11:07PM

बुकमार्क करा

म्हसवड : प्रतिनिथी

मासाळवाडी परिसरातील शेतकरी चार वर्षे दुष्काळामुळे पिळवटून गेला असताना शासन या शेतकर्‍यांच्या शेतातून विनामोबदला रस्ता काढून त्यांच्या संसारावरून नांगर फिरवत आहे. शासनाने जबरदस्तीने जमिनीचे अधिग्रहण न करताच काम सुरू केले, तर दि. 27 डिसेंबर रोजी आंदोलन तीव्र करून म्हसवड येथे रास्ता रोको व तलाठी कार्यालयावर सर्व शेतकरी आत्मदहन करतील, अशा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. 

म्हसवड-टेंभुर्णी महामार्ग क्र. 548 या राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्याचे काम म्हसवड हद्दीतून सुरू केले आहे. रस्त्याचे कोणतेही भूसंपादन करण्यात आले नाही. याबाबत मासाळवाडी परिसरातील शेतकर्‍यांनी तक्रार करूनही प्रशासकीय विभाग कसलीही दखल घेत नाही. याच्या निषेधार्थ बुधवारी शेतकर्‍यांनी काढलेल्या मोर्चात सर्वपक्षीय नेतेमंडळी सहभागी झाली होती.     

नगराध्यक्ष तुषार विरकर, माजी नगराध्यक्ष डॉ.वसंत मासाळ, नितिन दोशी, बाळासाहेब मासाळ यांच्यासह मान्यवर सहभागी झाले.

मोर्चा तलाठी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी सर्वच राजकीय नेते मंडळीनी शासनाच्या जुलमी कारभारावर कडाडून हल्ला चढवला.  इथला शेतकरी अगोदरच दुष्काळाने  पिचला आहे. त्याच्या संसारावर शासन नांगर फिवत आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची भुमिका सर्वांनी घेतली. 

यावेळी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, म्हसवड-टेभुर्णी हा रस्ता जुन्या नकाशाप्रमाणे करावा, रस्त्यालगतच्या सर्व सर्वे नंबरची मोजणी करूनच लागणारे क्षेत्र शेतकर्‍यांसमक्ष अधिग्रहण करावे, अधिगृहित क्षेत्राचा मोबदला काम सुरू होण्यापुर्वी मिळावा, जे निर्णय घेण्यात येणार आहेत, ते शेतात येऊन घ्यावेत.  शासनाने जबरदस्तीने करून महामार्गाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला तर दि. 27 रोजी म्हसवड येथे रास्ता रोको करून तलाठी कार्यालयासमोर सर्व शेतकरी कुटुंबासह आत्मदहन करतील, अशा इशाराही देण्यात आला आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक

आंदोलनकर्त्यांनी माण-खटावचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी दि. 7 रोजी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची शेतकर्‍यांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले.