होमपेज › Satara › तुम्ही मला मदत केली असेल तर हुमगावमध्ये मी मायनस कसा ?

तुम्ही मला मदत केली असेल तर हुमगावमध्ये मी मायनस कसा ?

Last Updated: Dec 10 2019 11:38PM
कुडाळ : प्रतिनिधी
शशिकांत शिंदे यांच्यासंदर्भात जे आमचे ठरले होते तसाच मी वागलो आहे. उलट उदयनराजेंशी बोलतानाही मी शशिकांत शिंदे यांची बाजू घेतली. असे असतानाही शशिकांत शिंदे पराभवाचे खापर माझ्यावर फोडत आहेत, हे चुकीचे आहे. तुम्ही मला मदत केली असे म्हणत असाल तर मग तुमच्या हुमगावात मी ‘मायनस’ कसा? सोनगावची मते कुठे गेली? सरताळे, बेलवडेत असे का झाले? याची उत्तरे द्या, असे आव्हान सातारा-जावलीचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांना दिले. दरम्यान, आमचे मन साफ आहे. त्यामुळे कुठेही सोक्षमोक्ष करायला मी तयार आहे. पराभवाचे खापर आमच्यावर फोडू नका, असा सल्लाही त्यांनी शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना दिला. 

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, मी माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याला शशिकांत शिंदेविरोधात काम करा असे सांगितले नाही. त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. जे ठरले होते त्याप्रमाणे मी गेलो आहे. उलट शशिकांत शिंदे म्हणतात त्यांनी मला जावलीत मदत केली मग हुमगाव मायनस कसे? सोनगावची मते कुठे गेली? बेलवडे, सरताळेत असं का झालं? याचे उत्तर शशिकांत शिंदे यांनी द्यावे. मीच त्यांना पाडले असे ते म्हणतात, मी कुठेही न जाता असे झाले असेल तर मग मी फार मोठा नेता आहे असेच म्हणावे लागेल. असे म्हणणे म्हणजे मोठी गंमतच आहे. मग जिल्ह्याचा मालकच झालो की काय? त्यांच्या मतदार संघात मी कुठेही लक्ष घालायला गेलो नाही. जे ठरलं होतं त्यानुसार मी वागलो आहे. उलट शशिकांत शिंदे यांच्या बाजुने उदयनराजेंशी बोलणारा मी होतो याला अनेकजण साक्षीदार आहेत. उगीच माझ्यावर पराभवाचे खापर फोडून माझ्या नावाने सगळीकडे शंख करू नका, असा टोलाही शिवेंद्रराजेंनी लगावला. 

माझं मन साफ आहे. कधीही सोक्षमोक्ष लावायला मी तयार आहे. जिथे असेल तिथे साक्ष काढण्याची आपली तयारी आहे. राज्यात कोणाचेही सरकार असुदे मला फरक पडत नाही. सत्तेत नसतानाही पाच वर्षात भरपूर विकासकामे केली आहेत. माझ्या अधिकारातील कामे कोणीही आडवू शकत नाही, त्यामुळे वरती कोणाचेही सरकार असुदे इथं फक्त आमचं सरकार राहणार आहे. त्यामुळे विकासकामांबाबतची कोणीही काळजी करू नये.