Tue, Jul 14, 2020 03:47होमपेज › Satara › शिवेंद्रराजेंसमवेत भरणार एकत्रित अर्ज : उदयनराजे भोसले

मागील वेळेप्रमाणे पळायला लावू नका : उदयनराजे भोसले

Published On: Sep 27 2019 2:18AM | Last Updated: Sep 27 2019 12:04AM

भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत बोलताना उदयनराजे भोसले. शेजारी अतुल भोसले, मनोज घोरपडे, शेखर चरेगावकर, महेश शिंदे, विक्रम पावस्कर व इतर.सातारा : प्रतिनिधी

लोकशाही मानणारा मी आहे, छत्रपती फक्‍त दोनच, एक शिवाजी महाराज आणि दुसरे संभाजी महाराज. मी मागील जन्मी पुण्य केल्यामुळेच मी त्यांच्या घराण्यात जन्माला आलो. मागच्या निवडणुकीत मला पळायला लावले मात्र आता यावेळी तसे करु नका, असे आवाहन श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले. दरम्यान, मंगळवार दि. 1 आक्टोबर रोजी मी लोकसभेसाठी तर शिवेंद्रराजे विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

सातारा लोकसभा मतदार संघातील भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ना. शेखर चरेगावकर, ना. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोजदादा घोरपडे, महेश शिंदे, विक्रमबाबा पाटणकर, भरत पाटील, सुनील काटकर, दत्ताजी थोरात, सुवर्णा पाटील, कविता कचरे, रंजना रावत, धनंजय जांभळे, विजय काटवटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, आयोगाने मला माझ्यावर इतक्या केसेस कशा आहेत? असे विचारले होते. मी त्यांना बोललो मला अन्याय सहन होत नाही. माझ्याशिवाय दुसरा तुमची कोण काळजी घेणारा असेल तर सांगा मी त्याचा मुख्यप्रचारक म्हणून काम करतो असेही ते म्हणाले.

ना. शेखर चरेगावकर म्हणाले, नियतीलाही मान्य नव्हते म्हणून आता पुन्हा भाजपचा खासदार होणार आहे. उदयनराजेंना देशात रेकॉर्ड होईल इतके मताधिक्य होईल. काहींनी विधानसभा आणि लोकसभा एकत्र होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवले होते. विधानसभा 8-0 करायची आहे. गट-तट विसरून कामाला लागावे, असे त्यांनी सांगितले.

ना. अतुल भोसले म्हणाले, उदयनराजे भोसले यांनी फक्‍त चार महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला आहे. तो त्यांच्या वैयक्‍तिक कारणासाठी नव्हे तर जिल्हयाच्या विकासासाठी दिला आहे. आता त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणणे हेच आपले काम असल्याचे यांनी स्पष्ट केले.

मनोज घोरपडेंसह भाजपचे पाच उमेदवार निश्‍चित : उदयनराजे 

उदयनराजे भोसले म्हणाले, माझे सगळ्याच पक्षात मित्र असून आमची मैत्री मर्यादित आहे. निवडणुकांच्या काळात अनेक अफवा पसरवल्या जातील त्यावर विश्वास ठेऊ नका. भाजपमध्येही माझे बरेच मित्र आहेत. त्यात अतुलबाबा हिरो आहेत, शिवेंद्र लाडके आहेत, त्यांच्यासह मनोज घोरपडे, महेश आणि मदनदादा हे पाच उमेदवार निश्चित असून त्यांना निवडून आणायचे आहे. 

शिवेंद्रराजेंसह कार्यकर्त्यांची पाठ....

सातारा लोकसभा मतदार संघातील भाजप पदाधिकार्‍यांच्या या बैठकीला सातारा शहरासह जिल्हयातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी हजर राहिले. मात्र, शिवेंद्रराजे भोसले व त्यांचा एकही कायकर्ता या बैठकीकडे फिरकलाही नाही.