Mon, Jul 13, 2020 22:54होमपेज › Satara › कोयना प्रकल्पावरील शेकडो ब्रास वाळूचे गौडबंगाल

कोयना प्रकल्पावरील शेकडो ब्रास वाळूचे गौडबंगाल

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 10:19PM

बुकमार्क करा

पाटण : गणेशचंद्र पिसाळ

कोयना प्रकल्पाच्या बांधकामासाठी आणलेली शेकडो ब्रास वाळू सध्या तेथे पडून आहे. गेली अनेक महिन्यांपासून पडलेल्या या लाखो रुपयांच्या वाळूवर अनेकांचा डोळा आहे. शासकीय कामांसाठी खासगी कंपनीकडून आणलेली ही वाळू आता पुन्हा कोठे वापरायची, त्याची वाहतूक यावरून सध्या महसुली अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

कोयना धरण व त्याअंतर्गत अन्य प्रकल्प यासाठी येथे यापूर्वी अनेक छोट्या, मोठ्या ठेकेदार कंपन्या कार्यरत होत्या. यापैकीच एक परराज्यातील पटेल इंजिनिअरिंग कंपनी. या कंपनीने पूर्वी कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा चारच्या कामासाठी हजारो ब्रास वाळू आणली होती. तथापि, आता येथे कोणत्याही प्रकल्पाचे किंवा खाजगी कंपन्यांचे काम सुरू नाही. मात्र या शासकीय कामांसाठी आणलेली ही शेकडो ब्रास वाळू गेली अनेक महिन्यांपासून पडून आहे. सध्या कोठेही वाळू मिळत नाही. त्यामुळे मग या वाळूकडे अनेकांनी मोर्चा वळविला असून यातून महसूल विभागाला हाताशी धरून काहीनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे,  असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. 

ज्या काळात वाळू उपसा बंद होता त्याकाळात शासकीय कामाच्या नावाखाली ही वाळू आणली होती. मात्र काम संपून अनेक महिने झाले तरी ही वाळू येथेच ठेवण्याबाबतची भूमिका स्पष्ट झाली नाही. ही वाळू शासकीय की खाजगी ठेकेदाराची याबाबीही अद्याप उघड झाल्या नाहीत. मात्र संबंधित ठेकेदारांनी ही शिल्लक वाळू इतरत्र नेण्यासाठी वाहतूक परवाना महसूल विभागाकडे मागीतला आहे.

अधिकार्‍यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले आहे. वास्तविक आता महसूल विभागाने जागेवर जाऊन ही वाळू नक्की किती, त्याची रॉयल्टी किती व कधी भरली आहे, त्याच्या पावत्या तपासणे गरजेचे आहे. याशिवाय ही वाळू शासकीय कामाच्या नावावर उचलली असेल तर मग ती त्या ठेकेदार कंपनीला अन्य खाजगी कामांसाठी कशी वापरता येईल? एवढे महीने ती का पडून ठेवली, साठा, पावत्यांचा ताळमेळ लावून त्याचा अधिकृत पंचनामा अथवा लिलाव करावा अशी मागणी होत आहे.