Sat, Dec 05, 2020 23:40होमपेज › Satara › महामार्गावर सुसज्ज रुग्णालयाची मागणी

महामार्गावर सुसज्ज रुग्णालयाची मागणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

भुईंज : वार्ताहर

महामार्गावर अपघातांचे  प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महामार्गावर सुसज्ज अशा रुग्णालयाची आवश्यकता आहे. भुईंज परिसरात अपघात झाल्यानंतर साताराशिवाय पर्याय नाही. टोलनाक्यावरील गर्दीमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे भुईंज परिसरात शासनाच्या माध्यमातून सुसज्ज रुग्णालय उभारले जावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
अपघातांचे मोठे प्रमाण, अवाढव्य कार्यक्षेत्र, आधुनिक सुविधांची वाणवा यामुळे या ठिकाणी सुसज्ज रुग्णालयाची मागणी गेली अनेक दिवस होत असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महामार्गावरील अपघातग्रस्तांचे जीव धोक्यात येत आहेत.

वाई तालुक्याच्या पूर्व भागात आणि पुणे बेेंगलोर महामार्गावर विस्तृत जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र असून रात्री अपरात्री येणार्‍या अपघातग्रस्त रूग्णांना देखील तातडीने उपचार देण्याची तत्परता या ठिकाणी पार पाडली जाते, पण ते उपचार प्राथमिक ठरतात. अतिशय महत्वाच्या आणि रूग्णांची मोठी वर्दळ असणार्‍या या रूग्णालयात कोणत्याही अत्याधुनिक सुविधा नाहित, ही वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी अतिदक्षता विभागासह विविध सुविधा, आधुनिक उपकरणे दिल्यास गंभीर रुग्णांना तातडीने सेवा देणे शक्य होणार आहे. 

या रूग्णालयात रूग्णांची नेहमीच गर्दी असते पण किरकोळ आजारांवरच येथे उपचार होत असल्याने अनेकांना नाईलाजाने गंभीर आजारांसाठी खासगी रूग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.  याठिकाणी सुसज्ज रुग्णालय होणे गरजेचे आहे. दररोज सुमारे 200 ते 250 रुग्ण याठिकाणी येतात पण पुरेसे डॉक्टर येथे हवे आहेत. रुग्णांच्या आरोग्याबाबत गांभिर्याने विचार होवून हा प्रश्‍न तातडीने मार्गी लागणे आवश्यक असून त्यासाठी जोमाने प्रयत्न व्हावेत, अशी मागणी होत आहे. या विभागातील लोकप्रतिनिधींनी तसे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मंजूर स्टाफ कागदावरच

रूग्णालयाचा विस्तार लक्षात घेवून या ठिकाणी 3 वैद्यकीय अधिकार्‍यांची तरतूद आहे. प्रत्यक्षात मात्र, या ठिकाणी मंजूर स्टाफ नेहमी कागदावरच असतो. एकच अधिकारी सलग बारा वर्षे आणि एकाच वर्षात बारा वैद्यकीय अधिकारी अशीही परस्पर टोकाची परिस्थिती याच रूग्णालयात पाहावयास मिळाली आहे.