Tue, Aug 11, 2020 21:37होमपेज › Satara › सातारा : हिंदू-मुस्लिम ऐक्य; गणेशमूर्ती, ताबूतांची एकत्रित मिरवणूक (Video)

सातारा : हिंदू-मुस्लिम ऐक्य; गणेशमूर्ती, ताबूतांची एकत्रित मिरवणूक (Video)

Published On: Sep 11 2019 12:38PM | Last Updated: Sep 11 2019 12:47PM
खटाव (सातारा) : प्रतिनिधी   

खटाव येथे गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्रितपणे उत्साहात साजरे करण्यात आले. विघ्नहर्ता गणपती आणि मोहरमच्या ताबूतांची एकत्रित प्रतिष्ठापना करण्यात आली होती. दोन्ही समाजाच्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत गणपती आणि ताबूतांची एकत्रित विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. 

खटावमध्ये गेल्या शंभर वर्षांपासून सुरू असलेली हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा नव्या पिढीनेही सुरू ठेवली आहे. येथील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर गेल्या अनेक वर्षांपासून मोहरमच्या ताबूतांची प्रतिष्ठापना केली जाते. ताबूत सजविण्याचा मान येथील हिंदू कुटुंबाकडे आहे. १९७२ पासून याच जागेवर अजिंक्य जनसेवा क्रिडा मंडळाच्या गणपतीचीही प्रतिष्ठापना केली जाते. १९८३ साली गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्र आले होते. तेव्हा गणपती आणि ताबूतांची एकत्र प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तब्बल ३५ वर्षानंतर पुन्हा एकदा गेल्या वर्षी हा योग जूळून आला होता. यावर्षी आणि पुढच्या वर्षीही हे दोन्ही सण एकत्रित साजरे करण्याची संधी दोन्ही समाजातील भक्तांना मिळणार आहे.

अजिंक्य मंडळाच्या गणेशमूर्तीशेजारी ताबूतचीही मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मुस्लिम आणि हिंदू समाजबांधवांनी ताबूतचे मनोभावे दर्शन घेतले. गणपतीची आरतीचा मान मुस्लिम बांधवांना देण्यात आला होता. काल ताबूत आणि गणेशमूर्तींचे वाजत गाजत एकत्रित विसर्जन करण्यात आले. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते.