Thu, Jan 28, 2021 21:22
अर्धनग्‍न मोर्चा धडकला सातार्‍यात

Last Updated: Jan 13 2021 11:34PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

खंडाळा तालुक्यात ज्यांच्या जमिनीवर कंपन्या उभारल्या गेल्या आहेत. त्याच स्थानिकांना कंपन्याकडून रोजगारापासून वंचित ठेवले जात आहे. याबाबत पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने येथील बेरोजगार कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर चड्डी बनियन घालून अर्धनग्‍न अवस्थेत मोर्चा काढला. बुधवारी या मोर्चेकर्‍यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन दिले. याबाबत त्वरित निर्णय न झाल्यास तालुक्यात मुळशी पॅटर्न होईल, असा इशारा दिला.

मंगळवारी सकाळीच अन्यायग्रस्त कर्मचार्‍यांनी शिरवळमधून पायी मोर्चा काढला होता. मात्र, सातार्‍यात येण्यास त्यांना रात्र झाल्याने या मोर्चेकर्‍यांनी बॉम्बे रेस्टॉरंट चौकातच आपला ठिय्या मांडला. यानंतर दुपारी 12 च्या सुमारास या आंदोलकांनी बॉम्बे रेस्टॉरंट ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर पुन्हा अर्धनग्‍न अवस्थेतच मोर्चा काढला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपले निवेदन सादर केले. 

निवेदनात म्हटले आहे की, खंडाळा तालुक्यात रेकॉर्डवर नोंद असलेल्या 453 कंपन्या आहेत. त्यात शिरवळ परिसरामध्ये अनेक औद्योगिक कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता व उपलब्धता असते. त्यानुसार स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, या कंपन्या शासन निर्णयाला कोलदांडा देत आहेत. अनेक उद्योगांनी स्थानिकांना रोजगार देण्यास अनुकूलताही दर्शवली आहे. परंतु, स्थानिक व ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वार्थापोटी आणि आडमुठ्या भूमिकेमुळे रोजगारावर गदा येत आहे. 

यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. याचा निषेध करण्यासाठी व सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून शांततेच्या मार्गाने शिरवळ ग्रामपंचायतीसमोर उपोषण देखील केले. परंतु, याला वाचा न फुटल्याने शिरवळ व परिसरातील जनतेमध्ये असंतोष पसरला आहे. त्या असंतोषाचा उद्रेक होऊन सामाजिक शांततेचा भंग होऊ नये, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या सर्व प्रकारात सहाय्य्क कामगार आयुक्त जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. तर लोकप्रतिनिधींमधूनही आवाज उठवला जात नाही. त्यामुळेच यावर निर्णय व्हावा अन्यथा जहाल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.