Sat, Jul 04, 2020 05:15होमपेज › Satara › महिंद धरणामुळे सणबूर विभागाची तहान भागली, आ. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नाला यश

धरणाची गळती काढल्याने मुबलक पाणी 

Published On: Feb 11 2019 1:28AM | Last Updated: Feb 10 2019 11:25PM
सणबूर : तुषार देशमुख

आ. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून महिंद धरणाची गळती काढल्याने लाखो लिटर  पाण्याची बचत होवून उन्हाळ्यात पाण्यासाठी टाहो फोडणार्‍या अनेक गावांना याचा फायदा होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

‘धरण उशाला अन कोरड घशाला’ अशीच काहीशी परिस्थिती येथील महिंद, बाचोली, सणबूर, बनपूरी,  जानूगडेवाडी, शितपवाडी, मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द या गावांची झाली होती. पावसाळ्यात महापूर तर उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा येथील लोकांना सहन कराव्या लागत होत्या. परंतू जानुगडेवाडी, मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे- खुर्द यासह येथील वाड्या चुकीच्या पध्दतीने मराठवाडी लाभक्षेत्रात टाकल्याने हाकेच्या अंतरावर महिंद धरण असून देखील या पाण्यावर त्यांना हक्क सांगता येत नव्हता. त्यामुळे    लाभक्षेत्र बदलून मिळावे यासाठी अनेकवेळा येथील शेतकर्‍यांनी व ग्रामस्थांनी मोर्चे तसेच आंदोलने करून शासन दरबारी न्याय मागण्याचा प्रयत्न केला परंतू याचा फारसा फायदा झाला नाही. शेवटी जानुगडेवाडी ,शितपवाडी आणि परीसरातील ग्रामस्थांनी आ. शंभूराज देसाई यांची भेट घेवून लाभक्षेत्र बदलून मिळावे यासाठी प्रयत्न करून ते मिळवले. पण धरणात गळतीमुळे अपूरा पाणी साठा असल्याने उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत होत्या त्यामुळे ग्रामस्थांनी एवढ्यावरच न थांबत आ. देसाई यांच्याकडे धरणाची गळती काढण्यासाठी निधी मिळावा यासाठी अग्रह धरून तो निधी तात्काळ मिळवला तसेच लिकेजच्या कामाचा शुभारंभ आ. देसाई यांच्या हस्ते करून काम गत पावसाळ्या पूर्वी गळती काढून काम पूर्ण केल्याने यंदा धरणात तुडूंब पाणी साठले असून याचा फायदा येथील ग्रामस्थ आणि शेतकर्‍यांना होत आहे. बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले असून पश्‍चिम महाराष्ट्रासह कर्णाटक राज्यातून नाईकबा दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना देखील या पाण्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होत आहे. 

एकूनच आ. देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून महिंद धरणाची गळती काढून मुबलक पाणीसाठी झाल्याने वर्षानूवर्षे पाण्यासाठी टाहो फोडणार्‍या जनतेला दिलासा मिळणार असून ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबणार असल्याने ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त होत आहे. आ. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून महिंद धरणासाठी भरघोस निधी मिळाल्याने धरणातील पाणी गळती थांबली आहे. यंदा धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे याचा लाभ शेतकरी, ग्रामस्थ आणि नाईकबा भक्तांना होत असल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.  जयवंतराव जानुगडे  उपसरपंच जानुगडेवाडी