Sat, Jul 11, 2020 19:41होमपेज › Satara › ६१ ग्रामपंचायतींमध्ये धूमशान

६१ ग्रामपंचायतींमध्ये धूमशान

Published On: Feb 18 2018 2:03AM | Last Updated: Feb 17 2018 10:40PMसातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या 77 पैकी 38 तर पोटनिवडणूक लागलेल्या 424 पैकी 23 अशा सर्व मिळून 61 ग्रामपंचायतींमध्ये धूमशान सुरू झाले. अर्ज माघार प्रक्रियेनंतर सार्वत्रिक निवडणुकांत 39 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. पोटनिवडणुकांकडे इच्छुकांनी सपशेल पाठ फिरवली.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांनी पुन्हा राजकीय वातावरण तापू लागले आहे. अर्ज माघार प्रक्रियेत संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रकियेतून एकाही उमेदवाराने अर्ज माघारी घेतला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत 38 तर पोटनिवडणुकांमध्ये 23 अशा 61 ग्रामपंचायतींमध्ये धूमशान होणार आहे. उमेदवारांनी माघार घेतल्याने बर्‍याच जागाही बिनविरोध झाल्या. सार्वत्रिक निवडणुकांसाठी 126 मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. 

उमेदवारांनी पोट निवडणुकांकडे सपशेल पाठ फिरवली. सातारा तालुक्यात पोट निवडणुकीत 66 पैकी 8 ग्रामपंचायतींमधून उमदेवारी अर्ज आले.   कोरेगाव तालुक्यातून 32 पैकी 1, जावली तालुक्यात 56 पैकी 2, वाई तालुक्यात 34 पैकी 1, खंडाळा तालुक्यात 15 पैकी 1, फलटण तालुक्यात 18 पैकी 2, माण तालुक्यात 6 पैकी 1, खटाव तालुक्यात 25 पैकी 2, कराड तालुक्यात 49 पैकी 4, पाटण तालुक्यात 80 पैकी 1  अर्ज आला.  महाबळेश्‍वर तालुक्यात 43 ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज आला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींची शेकडो पदे पुन्हा रिक्‍त राहिली. त्याठिकाणी पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाण्याची  शक्यता आहे. पोट निवडणुका लागलेल्या ग्रामपंचायतींसाठी 29 केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत.

संबंधित उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. 27 फेब्रुवारी  रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.  त्यानंतर दि. 28 रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.