Wed, May 12, 2021 01:00
अंबानी प्रकरणाने गोल्फ मैदान चर्चेत

Last Updated: May 05 2021 2:24AM

अंबानी प्रकरणाने चर्चेत आलेले गोल्फ मैदान.
महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या वॉक प्रकरणामुळे प्रसिद्धीपासून कोसो दूर असलेले गोल्फ कोर्स मैदान आणि या मैदानाची मालकी असलेली दि क्लब ही संस्था एकाएकी चर्चेत आली. मात्र दि क्लबकडे असलेल्या गोल्फ कोर्स मैदानाची मूळ मालकी क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानची असल्याची माहिती समोर आली असून हे मैदान भाडेपट्ट्याने नाममात्र दराने दि क्लब या संस्थेला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे पंधरा ते वीस एकर जागेचे वार्षिक भाडे पाचशे रुपयांपेक्षाही कमी आहे.

ब्रिटिश काळात दि क्लब या संस्थेची स्थापना झाली. अतिश्रीमंत उद्योगपती, उच्चपदस्थ अधिकारी, निवृत्त न्यायाधीश, जिल्हाधिकारी श्रेणीच्या कोणालाही या संस्थेचे सभासदत्व मिळत नाही. यावरून या संस्थेच्या सभासदांबाबत अंदाज येतो. उद्योगपती अनिल अंबानीसुद्धा या संस्थेचे सभासद नाहीत, तरीही त्यांना या मैदानावर कसे फिरुन दिले? हा चर्चेचा मुद्दा आहे.

या संस्थेची भव्य इमारत ही ब्रिटिशकालीन वास्तूकलेचा उत्तम नमुना आहे. या इमारतीपासून जवळच कितीतरी एकर जागेत गोल्फ कोर्स हे मैदान आहे. ब्रिटिशकाळात या ठिकाणी अति श्रीमंत मंडळी गोल्फ खेळायची. परंतु, आता हा खेळ फार कमी खेळला जातो. त्यामुळे या मैदानाचा आता फारसा वापर होत नाही.

दि क्लब संस्थेचे सभासद हे अति श्रीमंतांच्या श्रेणीत येतात. या संस्थेचे अथवा या संस्थेच्या सभासदांचे महाबळेश्वरसाठी योगदान काय? हा संशोधनाचा विषय आहे. अनेकांनी विनंती केली तेव्हा अति श्रीमंतांच्या या संस्थेने काही गरीबांना मोजून अन्नधान्याचे किट वाटले, हीच या संस्थेची मोलाची समाजसेवा.

सध्याच्या कोरोना संकटात या संस्थेच्या जागेचा वापर करुन याठिकाणी जंबो कोविड सेंटर उभे राहू शकते. पण, तसे या संस्थेला वाटत नाही. अंबानी प्रकरणामुळे ही संस्था चर्चेत आली आहे. आता ज्या अंबानींना त्यांनी गोल्फ मैदान फिरायला मोकळे करून दिले त्या संस्थेने किंवा अंबानी यांनी महाबळेश्वरच्या जनतेसाठी व्हेंटीलेटर्स असलेले कोविड हॉस्पिटल उभे करावे, अशी मागणी महाबळेश्वरकरांनी केली आहे. 

मैदानाचे भाडे 500 रुपयांपेक्षाही कमी

गोल्फ कोर्स मैदानाची जागा ही मूळची क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टची आहे. ब्रिटिश काळातच ही जागा दि क्लबला भाडे तत्त्वावर देण्यात आली होती. या मैदानाचा शेतसारा व त्या शेतसार्‍याच्या अडीच पट वार्षिक भाडे अशी ही आकारणी केली जाते.  त्यामुळे या मैदानाचे वार्षिक भाडे पाचशे रुपयांपेक्षाही कितीतरी कमी आहे.  ती जागा देवस्थानकडे परत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.