Tue, Aug 11, 2020 21:46होमपेज › Satara › सातार्‍यातील घंटागाडीवाल्यांना अखेर न्याय

सातार्‍यातील घंटागाडीवाल्यांना अखेर न्याय

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 08 2017 10:34PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

साशा कंपनीला सातार्‍यात भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार यांनी कायद्याचा बडगा दाखवला. घंटागाडी चालकाच्या बेमुदत संपाचे प्रकरण थेट जिल्हाधिकार्‍यांच्या कोर्टात गेल्याने पालिका प्रशासनाला घंटागाडीचालकांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.  शहराच्या पूर्व भागात सेवा देणार्‍या घंटागाडीवाल्यांना 20  हजार 500 रुपये तर पश्‍चिम भागातील घंटागाडीसेवेला 20 हजार रुपये देण्याचे ठेकेदार कंपनीने मान्य केले. 

सातार्‍यातील घंटागाडीवाल्यांचे आंदोलन चिघळले होते. कंपनी व घंटागाडीचालक यांच्यात रितसर अटी शर्थीसह करारनामा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांची  कानउघडणी करत शहरात ठप्प झालेल्या आरोग्यसेवेचा प्रश्‍न तात्काळ निकाली लावण्याची तंबी दिली होती. प्रभारी जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रसाद काटकर यांच्या दालनात झालेल्या  बैठकीत घंटागाडीचालक व पालिका प्रशासन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती.

विना करार 18 हजार पगार परवडत नसल्याची तक्रार घंटागाडीचालकांनी केली. मात्र पूर्वीचे करार रद्द न झाल्याने घंटागाडी चालकांशी चर्चा करण्याचा प्रश्‍न येतच नाही, असा पवित्रा घेतल्याने सिध्दी पवार    यांनी संताप व्यक्‍त केला. तातडीचे काम असल्याचे सांगत गोरे व आरोग्य सभापती वसंत लेवे हे बैठक सोडून गेले. मात्र, काटकर यांनी  गोरे यांना बोलावून चर्चेतून तोडगा काढण्यास सुचवले. या मिटिंगचा कार्यवृत्‍तांत रेकॉर्डवर घेण्यास सांगितले. ठेकेदार साशा कंपनीच्या  प्रतिनिधीनेही ही बाब मान्य केली. घंटागाडी चालकांशी रितसर करार करण्यात येईल, असेही स्पष्ट केले. नगरसेविका सिध्दी पवार यांच्या पाठपुराव्यामुळे नगरपालिकेला घंटागाडीचालकांच्या प्रश्‍नावर बॅकफूटवर जावे लागले, अशी चर्चा सुरु झाली आहे.

जिल्हाधिकार्‍यांची यशस्वी मध्यस्थी

घंटागाडीचालकांच्या आंदोलनामध्ये पालकमंत्री ना. विजय शिवतारे तसेच जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शिवतारे यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकार्‍यांनी घंटागाडीवाल्यांच्या आंदोलनात मध्यस्थी केली.  नगरसेविका सिध्दी पवार यांनीही पाठपुराव्यात सातत्य ठेवल्याने हा प्रश्‍न सुटल्याची प्रतिक्रिया घंटागाडीवाल्यांनी व्यक्‍त केली.