Mon, Jul 13, 2020 12:32होमपेज › Satara › गणेशमूर्तींची पुन्हा विटंबना नको

गणेशमूर्तींची पुन्हा विटंबना नको

Published On: Sep 04 2018 1:19AM | Last Updated: Sep 03 2018 8:07PMकराड : प्रतिभा राजे

गणेश विसर्जनाला अनेक गणेश मुर्ती विसर्जित केल्या जातात. कृष्णेच्या खोल पाण्यात विसर्जन केलेल्या पाण्यात न विरघळणार्‍या मूर्ती पाणी कमी झाल्यानंतर उघड्यावर पडल्या जातात. हे विदारक व भावनेला हेलावणारे दृष्य अनेक वर्षापासून कृष्णा नदीत दिसत आहे. ही विदारकता थांबवण्याचे काम गणेशभक्तांनाच शक्य आहे. त्यामुळे यंदापासून  शाडूच्याच मुर्तीच वापराव्यात, असे आवाहन पालिकेच्यावतीने केले आहे. 

गेल्या तीन वर्षापासून येथील कृष्णा नदीमध्ये विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती नदीतील पाणी कमी झाल्याने उघड्या पडल्या होत्या. या सर्व मूर्तींचे विसर्जन नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, तसेच कर्मचार्‍यांनी 600 हून अधिक मुर्तींचे पुन्हा जलकुंडामध्ये विसर्जन केले होते. उघड्यावर पडलेल्या या मुर्तींचे चित्र एवढे विदारक व भयानक होते की नागरिकांनीही पालिका कर्मचार्‍यांना तात्काळ मदत करत मूर्ती उचलण्यात आल्या. व त्यांचे पुन्हा विसर्जन करण्यात आले.

दरवर्षी पालिका चौकाचौकात जलकुंभ तयार करून मूर्ती जलकुंभामध्ये विसर्जित करण्याचे आवाहन करत असते. नागरिकांमध्ये जागृती होत आहे मात्र पुरेशा प्रमाणात जागृती होणे गरजेचे होणे गरजेचे आहे.  पालिकेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देवून गत वर्षी 2 हजार गणेशमूर्तींचे जलकुंभामध्ये विसर्जन करण्यात आले. तर 8 गणेशमंडळांनी मूर्ती जलकुंभामध्ये विसर्जित करण्यात आल्या होत्या. येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही कुत्रिम तळ्यामध्ये मूर्तीचे विसर्जन केले होते. नागरिकांनी जागरूता दाखवत यावर्षी किमान दुप्पट, तिप्पट संख्येने गणेशमूर्ती विसर्जित करणे गरजेचे आहे. शिवाय शाडूच्याच मूर्तींचे पूजन केले तरच गणेशमूर्तींची विटंबना थांबेल. तसेच निर्माल्य कुंडामध्ये निर्माल्य जमा केल्यास कृष्णा घाटावर अस्वच्छता पसरणार नाही. स्वच्छतेसाठी हा हातभार होईलच परंतु आरोग्यसाठीचा  पालिकेच्या या उपक्रमास नागरिकांनी हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दरवर्षी पालिकेकडून पुन्हा विसर्जन

कृष्णेचे पाणी आटल्यानंतर उघड्यावर पडलेल्या हजारभर मूर्तींचे पालिकेला दरवर्षी पुन्हा विसर्जन करावे लागते. पहाटे पासून अधिकारी, कर्मचारी यासाठी कार्यरत रहात असतात. या मूर्ती वॉटर वर्क्स येथील कृत्रिम तळ्यामध्ये विसर्जित करण्यात येतात तर कधी  तळ्यामध्ये एवढी जागा नसल्याने उर्वरित मूर्ती बोटीच्या सहाय्याने नदीपात्रात खोलवर विसर्जित करण्यात येतात. दरवर्षी पालिकेसाठी हे वाढीव काम झाले आहे.

प्लॅस्टर विरघळण्यास किमान 6 महिन्याचा कालावधी

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूतीर्र् पाण्यात लवकर विरघळत नाहीत. किमान सहा महिन्यांचा कालावधी यासाठी लागतो. तोपर्यंत पाण्यात या मूर्ती तशाच पडून राहतात. टेंभूचे पाणी अडवले किंवा कृष्णेचे पाणी कमी झाले तर या मूर्ती उघड्या पडतात. या मूर्तींचे हात, पाय,डोके तुटलेल्या अवस्थेत असतात. हे दृष्य अत्यंत विदारक असते. ज्या मूर्तींचे आपण भक्तीभावाने पूजन करतो. कोठेही धक्का लागू नये याची काळजी घेतो. त्याच मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर अशी अवस्था न बघवणारी व काळीज हेलावणारी असते. त्यामुळे ही अवस्था पाहूनही आपण शहाणे केव्हा होणार?